
भाविकांचा उत्साह शिगेला, यात्रा सजली,
देवस्थान तर्फे विविध कार्यक्रमांची मांदियाळी
उत्सवाची धामधूम व जय्यत तयारी
पाली : धम्मशील सावंत
सर्वाना वेध लागून राहिलेला विनायक माघमासोत्सव जोरदार सुरू झाला आहे. अष्टविनायक श्री बल्लाळ विनायकाचा माघमासोत्सव माघ शु. प्रतिपदा गुरुवार (ता. 30) ते माघ शु. पंचमी बुधवार (ता. 2) पर्यंत साजरा होत आहे. यानिमित्ताने देवस्थान तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी लाखो भाविक या महोत्सवात सहभागी होतात, त्यादृष्टीने देवस्थान प्रशासन, तालुका प्रशासनाने योग्य व नीटनेटके नियोजन केलंय.
यंदाही माघमासोत्सवानिमित्त पाली नगरी सजली आहे. उत्सवाची धामधूम व जय्यत तयारी पहायला मिळत आहे. या दरम्यान देशभरातून लाखो भाविक श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतात. भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहावयास मिळते.सर्वत्र धार्मिक व मंगल मय वातावरण निर्माण झाले आहे. आता पालीत मोठी यात्रा देखील भरलीय. यावेळी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे.
पालीत सद्यस्थितीत लाखो भाविक दाखल होतायत.
माघमासोत्सवानिमित्त अष्टविनायक श्री. बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. मोठी भव्य प्रवेशकमान उभारण्यात आले आहे. यात्रेसाठी आकाश पाळणे व इतरही पाळणे दाखल झाले आहेत. याशिवाय मिठाई, खेळणी विविध वस्तू आदींची दुकाने मांडली जात आहेत. हॉटेल तसेच इतर व्यावसायिक देखील जय्यत तयारीत आहेत. ठिकठिकाणी फिरते विक्रेते देखील दाखल झाले आहेत. सर्वत्र माघमासोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे.




Be First to Comment