
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !
प्रयागराज - भारताची संस्कृती, परंपरा आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी, तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारताला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र घोषित केले जावे, अशी प्रमुख मागणी महाकुंभ मेळ्यातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’त उपस्थित समस्त संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली. अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाकुंभ मेळ्याच्या पावन वातावरणात प्रयागराज येथे अखिल भारतीय धर्मसंघ, मोरी-संगम लोअर मार्ग चौराहा येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनात बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंवरील वाढते अत्याचार; बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका; काशी, मथुरा यांसह अन्य मंदिरांच्या मुक्तीचा संवैधानिक लढा; हिंदू मंदिरांचे सरकारीकरण; भारतभर उत्सवांच्या वेळी हिंदूंवर होत असलेली आक्रमणे; लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, दंगली आदी समस्यांवर हिंदु समाज, संघटना आणि संत-महंत यांना एकत्रित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे विचार संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मांडले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की , राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ हा शब्द हटवून भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जावे, तसेच लोकसंख्या नियंत्रण, धर्मांतरबंदी, गोहत्याबंदी कायदे लागू केले जावेत, राज्यघटनेद्वारे अल्पसंख्यांकांसाठी करण्यात आलेली विशेष तरतूद काढण्यात यावी, अशा केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे. अन्य धर्मियांच्या देशात तेथील बहुसंख्यांकाचाच हिताचा विचार होतो; मात्र भारत हिंदुबहुल राष्ट्र असतांनाही येथे हिंदूंच्या हिताचा रक्षण केले जात नाही. उलट हिंदूंवर अन्याय करून हिंदूंना सापत्नतेची वागणूक मिळत आहे. यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे अनिवार्य आहे. तसेच हिंदु राष्ट्राची विचारधारा ‘वसुधैव कुटंबकम्’ अर्थात् सर्वसमावेशक असल्यामुळे त्यातून संपूर्ण मानवजातीचे हित जोपासले जाईल.
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की , भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा बदलण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत. त्यामुळे सर्व हिंदूंनी मिळून आपली सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त केली पाहिजे. तरच आपल्या संस्कृतीचे रक्षण होईल. तसेच मंदिरांचे धन केवळ धार्मिक कार्यासाठीच वापरण्यात यावे.
हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले* , शतकानुशतके आमच्या तेजस्वी हिंदु सभ्यतेवर आक्रमणे केली गेली; मात्र आता हिंदु संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची चिन्हे स्पष्ट आहेत. काशी आणि मथुरा मुक्तीची मागणी भक्कम होत आहे. संभल येथे हिंदूंच्या नष्ट झालेल्या मंदिरांची मागणी होत आहे. ती न्यायाची मागणी आहे. आता लव्ह जिहादबरोबरच लँड जिहादच्या विरोधात हिंदूंना लढा द्यावा लागणार आहे.





Be First to Comment