पनवेल/ प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील वारदोली रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. माता भगिनींना विविध समस्यांच्या बाबत अवगत करत त्यांचे प्रबोधन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला शेकाप च्या राज्य महिला मध्यवर्ती समिती सदस्य, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रिती म्हात्रे जॉर्ज, सायकॉलॉजिस्टअनिशा कोल्हापुरे, नेरे केंद्र प्रमुख रंजना केणी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता भगिनींनी हळदी कुंकवाचा आनंद लुटला. त्यानंतर विविध खेळांच्या माध्यमातून महिलांनी कार्यक्रमांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी विविध उदाहरणे देत आजूबाजूच्या अन्याय अत्याचाराच्या घटनांबद्दल सगळ्यांचे समुपदेशन केले. आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीला कान देऊन ऐकलं पाहिजे. ते जर काही सांगायचा प्रयत्न करत असतील तर त्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांचं काही चुकत असेल तर आपण त्यांना समजावून सांगितले पाहिजे. कित्येकदा अन्याय अत्याचार करणारे घराच्या आजूबाजूला असतात. त्यामुळे मुलांशी सातत्याने संवाद साधणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
अनिशा कोल्हापुरे यांनी मासिक पाळीचे आजार, स्तनाचा कर्करोग अशा महिलांशी निगडित आरोग्य समस्यांचे बाबत विस्तृत विवेचन केले. कित्येकदा आपण मनाने देखील आजारी असतो त्यामुळे महिलांनी शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या.तर केंद्रप्रमुख रंजना केणी यांनी मूल समजून घेताना… या अत्यंत संवेदनाशील विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. यामध्ये पालक आणि मुलांच्यात सकारात्मक संवाद असणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
माजी नगरसेविका प्रिती म्हात्रे जॉर्ज, अनिशा कोल्हापुरे, केंद्र प्रमुख रंजना केणी, पोयंजे केंद्रप्रमुख संजय केणी, ग्रामपंचायत वारदोलीच्या माजी उपसरपंच जानवी बताले, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आशा भोपी, वर्षा म्हात्रे, धनश्री पाटील, प्रगती पाटील, मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी, उपशिक्षिका ज्योती भोपी यांच्यासह अनेक महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.





Be First to Comment