Press "Enter" to skip to content

`सरपंच चषक’ चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन

हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे : महेंद्रशेठ घरत

उलवे नोड : “धुतूम हे हुतात्म्यांचे गाव आहे. रघुनाथ अर्जुन ठाकूर हे १९८४ च्या आंदोलनात हुतात्मे झालेत, परंतु हुतात्म्यांचे गाव असलेल्या धुतूममध्ये तरुणांना खेळण्यासाठी अधिकृतरित्या मैदानच नाही.जी जागा मैदानासाठी प्रस्तावित केली ती सीआरझेडमध्ये येत असल्याचे सांगण्यात येते परंतु सिडकोने सर्व निकष बाजूला ठेवून हुतात्म्यांच्या धुतूम गावाला अधिकृतरित्या मैदान द्यावे.  `हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, किंबहुना ते वाया जाऊ द्यायचे नाही,’ असे दि. बा. पाटील साहेब छातीठोकपणे सांगत होते हीच माझीही भूमिका आहे त्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीत आहे. काहीही झाले तरी चालेल परंतु हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान हे मिळालेच पाहिजे यासाठी मी आग्रही आहे.’’ उरण तालुक्यातील हुतात्म्यांचे गाव असलेल्या धुतूम येथे `सरपंच चषक’ चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २१) रात्री उद्घाटन करण्यात आले त्यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते. ग्रामस्थांनीही या लढ्यात साथ द्यावी असे आवाहन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले.

धुतूमच्या सरपंच सुचिता ठाकूर गावाच्या विकासासाठी उत्तम काम करीत आहेत. त्या महिला सरपंच असल्याने मला विशेष अभिमान आहे. महिलांच्या सन्मानासाठी मी नेहमीच अग्रेसर असतो.स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे ही अभिमानास्पद बाब असून सरपंचांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असेन ,’’ असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले. 
धुतूमच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त `सरपंच चषक’ हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी शाल, श्रीफल आणि स्मृतिचिन्ह देऊन आयोजकांच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी पी. जी. शेठ ठाकूर, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर तसेच धुतूम ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. किरीट पाटील, लंकेश ठाकूर, श्रेयश घरत, विनोद पाटील आदित्य घरत, राजेंद्र भगत, किरण कुंभार आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.