Press "Enter" to skip to content

अविष्कार अभियान अंतर्गत रायगड मधील मुलांची नागपूर स्वारी

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील नैपुण्य प्राप्त शाळांचा नागपूर येथे अभ्यास दौरा

पनवेल /प्रतिनिधी.
रायगड जिल्हा परिषद आयोजित केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४-२५ राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन नागपूर येथील रामण विज्ञान केंद्र व तारामंडळ, नागपूर येथे १५ व १६ जानेवारीदरम्यान करण्यात आले होते. या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या ६ शाळांची निवड करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी नागपूर येथे भेट दिली.या भेटीत विविध स्थळांना भेटी देत विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कुतूहलाला प्रात्यक्षिक शिक्षणाशी जोडले गेले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम व विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव खालापूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोदे पाचनंद पनवेल, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेढेखार अलिबाग, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेणवई रोहा, रायगड जिल्हा परिषद शाळा, चरई पोलादपूर व रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवघर सुधागड या शाळेतील एकूण ४३ विद्यार्थी व शाम लवंगारे शाळा चरई, योगिनी वैदू शाळा तळोदे पाचनंद, शिल्पा सुर्वे शाळा, शेणवई रोहा, मनीषा अंजर्लेकर शाळा मेढेखार अलिबाग, अनुजा माने शाळा नवघर पाळावी सुधागड या शिक्षकांची निवड करण्यात आली होती. सुभाष राठोड, शाळा वडगाव यांची या सहलीसाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

   सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना रामण विज्ञान केंद्र व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली. तारामंडळाची रचना, निर्मिती यावर थ्रीडी शो दाखवण्यात आला. नागपूर येथील दीक्षाभूमी, ताजबाग, महाराज बाग प्राणिसंग्रहालय सफर अशी विविध प्रेक्षणीय स्थळे व पर्यटनाचा आनंद मुलांनी लुटला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद यांनी प्रवासादरम्यान व सहलीदरम्यान सतत संपर्कात राहून सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे यांनीसुद्धा विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी ही एक पर्वणीच होती. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अशा सहलीचे आयोजन महत्त्वाचे आहे. केंद्रीय प्रकल्पांतर्गत एमपीएसपीच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रशासनाने हाती घेतलेले या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत असल्याची ओरड आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांना खाजगी शाळांच्या महागड्या शिक्षणाशी स्पर्धा करावी लागत आहे. परंतु अविष्कार सारख्या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांतील उच्चविद्याविभूषित शिक्षक व शैक्षणिक गुणवत्ता यांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना येतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.