नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र रायगड जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला व जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत अलिबाग बस स्थानकासमोर नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी म्हणजेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादे पेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवू नये, वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या अशा नियमांविषयी जनप्रबोधन करण्यात आले.
तसेच उपस्थित युवक-युवतीने ट्राफिक पोलिसांच्या सहाय्याने ट्राफिक कंट्रोलिंग साठी सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले. तसेच यावेळी जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबागचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक प्रकाश काळोखे, वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी प्रियांका घरत, पोलीस हवालदार म्हात्रे, पोलीस हवालदार अमित साळुंखे, नेहरू युवा केंद्राचे कर्मचारी जयेश म्हात्रे, बार्टी समतादूत अनुजा पाटील, स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक-युवती उपस्थित होते.
Be First to Comment