Press "Enter" to skip to content

महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!

बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन

प्रयागराज – महाकुंभमेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक भाविक स्नानासाठी एकत्र येणार आहेत; मात्र आज आपल्याला बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय-अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. बांगलादेशात आज आपली मंदिरे आणि मूर्ती तोडल्या जात आहेत. ही समस्या सोडवायची असेल, तर बांगलादेश, भारत आणि विदेशातील सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. तेव्हाच यावर उपाय काढता येईल. यासाठी हिंदु जनजागृती समितीने लावलेले काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन भाविकांनी नक्की पाहावे, असे आवाहन इस्कॉनचे वृंदावन धाम येथील श्री चंद्रोदय मंदिराचे स्वामी कंजलोचन कृष्णदास यांनी केले.

ते महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सेक्टर ६, कैलाशपुरी, भारद्वाज मार्ग येथे काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर कट्टरवादी आणि आतंकवाद्यांनी केलेल्या भीषण अत्याचारांविषयीच्या चित्रप्रदर्शन व ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी स्वामी कंजलोचन कृष्णदास, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी इस्कॉनचे स्वामी राधामोहन दास आणि समितीचे उत्तर प्रदेश व बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

स्वामी कंजलोचन कृष्णदास पुढे म्हणाले, “काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर काय होत आहे? इतर राज्यांतील हिंदूंची काय स्थिती आहे? याची महत्त्वपूर्ण माहिती या प्रदर्शनातील फलकांवरून मिळते. कुंभमेळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांनी हे प्रदर्शन जरूर पाहावे. तसेच ‘सनातन धर्म काय आहे?’ याची संपूर्ण माहिती या प्रदर्शनातून सहजपणे घेता येईल.”

१९ जानेवारी १९९० रोजी आतंकवादामुळे काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून विस्थापित होऊन ३४ वर्षे झाली आहेत. मात्र सरकार, न्यायालय आणि संसद असूनही विस्थापित हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन न होणे हा लोकशाहीचा पराभव आहे. या प्रदर्शनात काश्मीर आणि बांगलादेश येथे झालेला हिंदूंचा नरसंहार, साधुसंतांच्या हत्यांचे षड्यंत्र, लव्ह जिहाद, धर्मांतराची समस्या आणि उपाय, गोरक्षा, मंदिर संरक्षण, दंगलीच्या वेळी हिंदूंचे संरक्षण, देवतांचा सन्मान, अशा धर्मरक्षा कक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रजागृती कक्षामध्ये जिहादी आतंकवाद, राष्ट्रद्रोही हलाल जिहाद, राष्ट्रपतीचा सन्मान, स्वदेशी अस्मितेचे संवर्धन, सुराज्य अभियान यासंबंधी माहितीपूर्ण फलक प्रदर्शन असेल. हिंदु राष्ट्रासंबंधी आक्षेप व त्यांचे खंडन, संत व धर्मप्रचारकांचे मार्गदर्शन, शंकासमाधान, आणि हिंदूंना धर्माचरण करण्यास प्रेरित करणारे कक्ष प्रदर्शनात असतील, असे समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.