
श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भूमिपूजन !
सात्रळ, (राहुरी, अहिल्यानगर) : ” तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले. रामशेठ तर कमवा आणि शिका, या ‘रयत’च्या योजनेत सातारा येथे शिकले. माझेसुद्धा पदवीपर्यंतचे शिक्षण ‘रयत’मुळेच झाले. एकंदरीतच रयत शिक्षण संस्थेच्या दर्जेदार शिक्षणामुळेच मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी ‘रयत’चा एक ‘सेेवक’ म्हणूनच कन्या विद्यालयाला 25 लाखांची मदत केली. मी माझे कर्तव्य केले”, असे मत महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले.
श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कामगिरीबद्दल काॅम्रेड पी. बी. कडू पाटील ‘समाजक्रांती पुरस्कार’ देण्यात आला. तो माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांनी स्वीकारला.
यावेळी महेंद्रशेठ म्हणाले, “मी माझ्या कमाईतला 25 टक्के वाटा समाजासाठी खर्च करतो, तो केवळ मी समाजाचे देणे लागतो, या भावनेनेच. मी माझ्या घरातूनच सर्वांना समान वाटा, ही अंमलबजावणी केली. त्यामुळेच मी आज समाधानाचे जीवन जगत आहे. तसेच रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व मोठे आहे, मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य करतोय.”

रविवारी (ता. १९) अहिल्यानगर जिल्ह्यातील (अहमदनगर) राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे हा समारंभ झाला. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी आणि रयतचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या हस्ते विशेष देणगीदार म्हणून सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफल देऊन महेंद्रशेठ घरत यांचा सन्मान करण्यात आला.
मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ, तसेच कृतिशील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा, तसेच स्वच्छ, सुंदर शाळा पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
यावेळी काॅम्रेड पी. बी. कडू फौंडेशनतर्फे महेंद्रशेठ घरत यांचे अभिनंदन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे सातारा चअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक वर्षापासून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रयत शिक्षण संस्थेत कालानुरूप दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखण्यात येईल.
व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे काळाच्या पुढचा विचार करतात. म्हणूनच देशात रयत शिक्षण संस्था शैक्षणिक धोरणे राबवण्यात आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांच्या आणि रयत सेवक, आजी- माजी मुख्याध्यापक यांच्या अलोट गर्दीत सोहळा रंगतदार झाला.




Be First to Comment