![](https://citybell.in/wp-content/uploads/2024/12/9786e514-6483-44e1-88a9-505e228a103f-1024x576.jpeg)
चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा ! – हिंदू जनजागृती समिती
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ६ डिसेंबर या दिवशी परळी बाजारपेठ, सुधागड पाली येथील श्री बहिरीनाथ मंदिर येथे झालेल्या आंदोलनात करण्यात आली.
‘हिंदू जनजागृती समिती’च्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात श्री संप्रदाय,व्याघ्रेश्वर मंडळ, स्वराज फौंडेशन, शिवदल युवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती आणि सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी केंद्र शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक अत्याचार, मंदिरांवरील हल्ले, महिलांवरील अत्याचार आणि मालमत्तेच्या लुटमारीचा सामना करत आहे. स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी अशा अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ज्याप्रमाणे भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) करून बांगलादेशातील पीडित अल्पसंख्यांक हिंदूंना भारताचे नागरिक होण्यासाठी हिंदूहिताचा एक चांगला निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय भारतासाठी केवळ शेजारील प्रश्न नसून हिंदूंच्या अस्तित्वाचा, मानवाधिकार आणि धर्मस्वातंत्र्याचा संवेदनशील विषय आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षाही हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केली आहे.
![](https://citybell.in/wp-content/uploads/2024/12/ec7b1588-bf31-4f91-a72c-8ba9d901d739-710x1024.jpeg)
Be First to Comment