हृदयविकार असलेल्या नागरीकांसोबत व्हॅलेंटाईन दिन साजरा
सिटी बेल • मुंबई •
आपल्या प्रिय व्यक्तींच्या सानिध्यात राहून व्हॅलेंटाईन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेणे तसेच त्या व्यक्तीवर काही संकट आले तर त्याला साथ देणे असाही व्हॅलेंटाईन दिनाचा संदेश असून आज मुंबईत हृदयविकार असलेल्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांसोबत घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला. या खास दिनानिमित्त ज्या डॉक्टरांनी हृदयविकार असलेल्या रुग्णांवर शल्यचिकित्सा केली होती त्याच डॉक्टरांनी हा विशेष दिन साजरा केला.
हृदयशल्यचिकित्सा झाल्यावर सहा ते आठ महिन्यांनंतर काही नागरिक थोडेसे बिनधास्त होतात म्हणजेच ते स्वतःची काळजी घेत नाहीत त्यामुळे हृदयविकार असलेल्या नागरिकांसोबतच त्यांच्या कुटुंबाचे सुद्धा समुपदेशन करणे गरजेचे असते याच उद्देशाने झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. चेतन शहा व डॉ. जितेश देसाई यांनी शल्य चिकित्सा केलेल्या नागरिकांना व त्यांच्या नातेवाईकाना व्हॅलेंटाईन दिनानिमित्त एकत्रीत बोलविले होते.

यावेळी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे चीफ ऍडमीन ऑफिसर रेनी वर्गीस, विक्री आणि विपणन प्रमुख आशिष शर्मा, व हॉस्पिटमधील नर्सेस उपस्थित होत्या. हृदयशल्यचिकित्सा झालेल्या २५ नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गुलाबाचे फूल देऊन व्हॅलेंटाईन दिन साजरा केला.हा व्हॅलेंटाईन दिवस आनंदाचा किंवा प्रेमाचा उत्सव केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर मनातील प्रेमासाठी साजरा केला जातो आणि आपल्या मनातील ते प्रेम कोणासाठीही असू शकते. त्यामुळे हा दिवस तुम्ही आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्रमैत्रीण कोणासाठीही साजरा करू शकता. आपल्या मनातील व्हॅलेंटाईन कोणीही असू शकतं अशी भावना हृदयशल्यचिकित्सा झालेल्या ८५ वर्षीय प्रीतम सिंग यांनी बोलून दाखवली.








Be First to Comment