Press "Enter" to skip to content

काँग्रेसचा वटवृक्ष उन्मळून पडला

‘स्थगिती सम्राट’ रमणिकशेठ माखेजा कालवश

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल नगरीच्या नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा स्थगिती सम्राट रमणिकशेठ माखेजा यांचे हृदयविकाराने काल निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पनवेलच्या व्यापारी आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली.
उद्या त्यांच्यासाठी गुरुवारी, (ता. 7) दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक सभागृह, ठाणा नाका येथे शोकसभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती त्यांचे सुपुत्र समीर माखेजा आणि कुटुंबीयांनी दिली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले रमणिकशेठ माखेजा यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पनवेलपासून ते तत्कालीन कुलाबा जिल्हा पिंजून काढत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे काम केले आहे. ते अलीकडील काही महिन्यांपर्यंत कार्यरत होते. अलीकडे पक्षात ते सक्रीय नव्हते मात्र पक्ष निष्ठेमुळे आजही महत्वाच्या कार्यक्रमाला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची.

माखेजा यांच्या राजकीय कारकिर्दीत पनवेलमध्ये कॉंग्रेससोबत शेकाप प्रबळ होता. त्यावेळी नगर परिषदेत शेकापचे नेते दि. बा. पाटील नगराध्यक्ष होते. त्यांच्याशी कॉंग्रेसचे हाडवैर असल्याने सभागृहात शाब्दिक चकमकी झडत असत. रमणिकशेठ माखेजा, कांतीलालशेठ बांठिया, आबासाहेब पन्हाळे यांचा भक्कम वैचारिक आणि बुद्धीवाद्यांचा चमू त्यावेळी कॉंग्रेसमध्ये कार्यरत होता.

राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीपर्यंत म्हणजे साधारणतः 1979 पर्यंत पनवेल कॉंग्रेसमध्ये हे नेते विरोधकांना थेट भिडत राहिले. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनाही त्यावेळी निष्ठावंत आवडत असत.

रमणिकशेठ माखेजा हे तसे बुद्धीवादी आणि तितकेच कडवट नेते होते. कायद्याची त्यांना चांगली जाण होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सभागृह आणि रस्त्यावरच्या सभाही अमोघ वाणीने गाजवल्या आहेत.
विषयाची खडानखडा माहिती असलेले नेते म्हणजे रामणिकशेठ होते. सभागृहात विषय पटला नाही की ते थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करून जिल्हाधिकारी यांच्याशी कायद्याने प्रखर युक्तिवाद करून हमखास त्या विषयाला स्थगिती मिळविण्यात त्यांचा हातखंडा होता. पुढे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातसुध्दा त्यांनी अनेक प्रकरणे दाखल करून स्थगिती मिळविली होती. अशा शंभराहून अधिक प्रकरणात स्थगिती मिळवण्यात त्यांना यश आल्याने स्थगिती सम्राट अशी बिरुदावली त्यांच्या नावापुढे जोडली गेली.

शहरातील काही मोजक्या घरंदाज घराण्यांपैंकी माखेजा हे राजकारणातील घराणे म्हणून ओळखले जात होते. रमणिकशेठ यांनी त्यांच्या गुजराथी समाजाला फार मोठे योगदान देत समाजाला एका छत्राखाली घट्ट विणून ठेवले आहे. त्यांनी न्यू. इंग्लिश गुजराथी शाळा सुरू करून सामाजाला शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर ठेवले आहे.

ते प्रभू रामभक्त होते. श्री गोंदवलेकर महाराजांचे ते शिष्य होते. या वयातही ते दर पौर्णिमेला गोंदवले येथे महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत. मसाला गिरणी सांभाळत ते फावल्या वेळेत नामस्मरण करित असत. त्यांच्या निधनाने पनवेलच्या इतिहासाचा एक साक्षीदार हरपला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.