सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
करंजाडे वसाहतीत बिल्डर कडून जमीन मालकांची फसवणूक : न्यायासाठी जमीन मालकांची आर्त हाक
पनवेल तालुक्याचा विकास होत असताना मुळ पनवेल शहरा शेजारी अनेक वसाहती उभ्या राहत आहेत. यातच गेल्या काही वर्षांपासून करंजाडे वसाहत नावारूपाला येत आहे. परंतु विकास होत असताना येथील मूळ जमीन मालक मात्र बिल्डरांकडून फसविले जात आहेत. आता याविषयी दाद मागायची तरी कोणाकडे ? असा प्रश्न या जमीन मालकांना पडला आहे.
करंजाडे गावातील किशोर नामदेव गायकवाड व दत्ताराम नामदेव कैकाडी यांच्या मालकीची ची जमीन त्यांनी वेलोसिटी बिल्डर्स चे मालक असलेल्या प्रभाकर अहिरे, राकेश कुमार जैन, अजितकुमार कोठारी, राजेंद्र गांधी यांना ६०/४० या तत्वावर विकसित करण्यासाठी दिली. अशा प्रकारचे त्यांचे ॲग्रीमेंट 2 जानेवारी 2013 मध्ये करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष या जमिनीवर इमारत बांधण्याचे काम ऑगस्ट 2017 मध्ये सुरू झाले. परंतु हे काम वेलोसिटी बिल्डर्सने सुरू न करता डिवाइन बिल्डरने सुरू केले. याबाबतीत मूळ जमीन मालकाने वेलोसिटी बिल्डर्स यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता सदरचे काम मीच करीत आहे. परंतु डिवाइन बिल्डर्स यांना या ठिकाणी इमारत बांधण्याचे आम्ही कंत्राट दिले आहे असे सांगण्यात आले.

त्यानंतर 2020 मध्ये सदरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वेलोसिटी बिल्डर्स ने जमीन मालकांना एक सदनिका त्यांच्या नावावर करून दिली. ही सदनिका देईपर्यंत सिडकोकडून या बिल्डर्सना ओसी देण्यात आली नव्हती. त्यानंतर मात्र सिडकोने ओसी दिल्यानंतर सदर बिल्डरने आपले हात वर केले आणि जमीन मालकांना ठरल्या प्रमाणे 18 सदनिका व दोन गाळे देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच डिवाइन बिल्डरने देखील सदरची इमारत माझ्या मालकीची असून यात आता तुम्हाला काहीच मिळणार नाही असा पवित्रा घेतला.
त्यानंतर सदर जमीन मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बिल्डर्स व जमीन मालक यांच्यात काही गोष्टीत समझोता झाला. त्याप्रमाणे सुञ ठरविण्यात आले. परंतु पोलीस ठाण्यात मान्य करण्यात आलेल्या गोष्टी नंतर डिवाइन बिल्डरने देखील पूर्ण केल्या नाहीत. आता पोलिसांचेही हा बिल्डर ऐकत नाही त्यामुळे फसवणूक झालेले जमीन मालक जाणार तरी कुठे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सद्यस्थितीत डिवाइन बिल्डर्स जमीन मालकांना देण्यात आलेल्या सदनिकांची तसेच गाळ्यांची परस्पर विक्री करीत असल्याने या जमीन मालकांनी इमारती बाहेर सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले आहेत. सदर फलक लावल्यानंतर आता बिल्डर कडून जमीन मालकांना ठार मारण्याच्या तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तशी तक्रार देखील जमीन मालकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे आता या फसवणूक झालेल्या जमीन मालकांना न्याय मिळावा ही मागणी करण्यात येत आहे.









Be First to Comment