एक मिशन म्हणून नशामुक्त अभियानाला सुरुवात : अपर पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
व्यसनी व्यक्तीवर त्याचे शारीरीक दुष्परिणाम होतच असतात, तरंतु त्याचे सगळ्यात मोठे दुष्परिणाम हे समाजावर होतात. गुन्हेगारीचे मुळ उगमस्थान हे व्यवसानातुनच होत असते, त्यामुळे अंमली पदार्थाची नशा करणे ही एक सामाजिक समस्या आहे. त्यामुळे नशामुक्त पोलीस आयुक्तालय ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांना, तरुणांना व समाजाला वाचविण्यासाठी एक मिशन म्हणुन नशामुक्त नवी मुंबई अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील यांनी केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने नशा मुक्त नवी मुंबई अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागरीक सेवा संघ, शाळा, महाविद्यालय, स्वंयसेवी संस्था व नशा मुक्त चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे जनजागृतीपर व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन वेगवेगळे उपक्रम राबविले. या अभियानाचा समारोप सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयात झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन साम टीव्हीचे संपादक राजेंद्र हुंजे, भारती विद्यापिठचे डॉ.विलास कदम, डॉ.राजेंद्र राठोड, विनायक पवार, डॉ.भारती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बी.जी.शेखर पाटील म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकिस आणुन आरोपीला अटक करणे ही दोन महत्वाची कामे पोलिसांची असली तरी, जोपर्यंत जनता पोलिसांच्या सोबत येत नाही, त्यांच्या खांद्याला खांदा लावुन काम करत नाही, तोपर्यंत कायद्याची अमंलबजावणी होऊ शकत नाही. तसेच पोलिसांचा वचक असल्याशिवाय कुठलाही समाज सदृढ व सुसंस्कृत होऊ शकत नाही. जिथे कायद्याचे राज्य संपते, तिथे कुठल्याही प्रकारचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या या नशामुक्त अभियानात सहभागी होण्याचे आवाहन अपर पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील यांनी केले.
या अभियानात विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, प्राध्यापक, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, समुपदेशक या सर्वांचा सहभाग महत्वाचा असून हे सर्वजण एकत्र आल्यास हे अभियान यशस्वी होईल असा विश्वास शेखर पाटील यांनी व्यक्त केला. तसेच नशा मुक्तीचे हे अभियान सामाजिक चळवळ व्हावी, या उद्देशाने गत ऑक्टोबर महिन्यांपासूनच हे अभियान राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

तर साम टीव्हीचे संपादक राजेंद्र हुंजे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना, पोलीस नशा मुक्त अभियानाच्या माध्यमातुन व्यसनाच्या आहारी गेलेल्या व त्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत असतात, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एक मित्र म्हणुन करत असताना, त्यांचे काम खुप महत्वाचे असल्यामुळे त्या वर्दीला व त्या वर्दीत असलेल्या माणसाला सन्मान दिलाच पाहिजे असे स्पष्ट केले. तसेच व्यसनाधीनतेमुळे आपला ट्रॅक सोडलेल्या माणसाला, मुळ ट्रॅकवर आणणे व त्यासाठी पोलिसांची मदत घेणे, एनजीओ म्हणून संस्थांनी पोलिसांच्या मदतीने हे कार्य पुढे नेणे म्हणजे, आपल्या गावाला, परिसराला, राज्याला व देशाला नशामुक्त करण्यासारखे असल्याचेही हुंजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी राजेंद्र राठोड, डॉ.विनायक पवार, डॉ.भारती मोरे व इतरांनी नशामुक्तीवर आपले मनोगत व्यक्त करतानाच, कवितेच्या माध्यमातून नशामुक्तीवर प्रकाश टाकला. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment