तक्रार करून २० दिवस उलटले,परिवहन खाते कारवाई करणार केव्हा ?
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल तालुक्यातील सजग सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मधुकर भगत यांनी दोन आठवड्यापूर्वी वाहतूक व परिवहन खात्याला पुराव्यासह तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा एका धन दांडग्या कंपनीचे हायवा डंपर व कंटेनर सर्रास पणें कायद्याला फाट्यावर मारून नियमबाह्य वाहतूक करत आहेत. या प्रकारामुळे परिवहन खात्याची सदर कंपनीवर मेहेरनजर असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना येऊ लागला आहे.
या प्रकाराबाबत सविस्तर हकीकत घेण्याचा प्रयत्न केल्यावर आमच्या प्रतिनिधीला अशी माहिती मिळाली की भगतवाडीतील रहिवासी प्रमोद मधुकर भगत यांनी 4 डिसेंबर 2020 रोजी पनवेलच्या परिवहन खात्याला अर्ज सादर करून 26 हायवा डम्पर चे क्रमांक सादर केले होते.ही सर्व वाहने नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त माल लादून वाहतूक करत असल्याची तक्रार त्यांनी सदर अर्जात नमूद केली होती.
सदर वाहने दिवसभरात किमान दहा फेऱ्या मारत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.या तक्रार अर्जाची पोच झाल्याची नोंद देखील पनवेलच्या वाहतूक व परिवहन कार्यालयात झालेली आहे. असे असले तरी अर्ज करून वीस दिवस उलटले तरीसुद्धा नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

त्यामुळे नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या कंपनीवर परिवहन खात्याची मेहेरनजर असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये बळावू लागला आहे.ही सर्व वाहने रॉयल ट्रान्स इन्फ्रा कंपनीसाठी काम करत असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती घेतली असता ग्रामस्थांनी असे सांगितले की ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल लादून फेऱ्या करत असतात. तसेच ही वाहने चालविणारे चालक बेदरकारपणे वाहने चालवत असतात.क्षमतेपेक्षा जास्त माल लादलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांना आपली वाहने बाहेर काढणे जिकरीचे वाटते.बेफाम वेगाने नियमबाह्य पद्धतीने ये-जा करणाऱ्या सदर अवजड वाहनांच्या मुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका उत्पन्न झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांची हीच भूमिका गांभीर्याने घेत प्रमोद भगत यांनी वाहतूक व परिवहन खात्याला तक्रार अर्ज सादर केला आहे.
लेखी स्वरूपात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर देखील वाहतूक व परिवहन खाते सुशेगाद असल्याने सदर कंपनीने वाहतूक व परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांचे हात ओले केले की काय ? या संशयाला पुरेपूर जागा आहे. अर्थातच त्यामुळे आमच्या जिवाचा सौदा किती लाख रुपयांना केलात असा खडा सवाल येथील रहिवासी परिवहन खात्याला विचारत आहेत.
एरवी अद्ययावत डिजिटल माध्यमातून फोटो काढून कारवाईचा बडगा उगारण्यासाठी तत्पर असणारे वाहतूक व परिवहन खाते तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सुद्धा डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढून का झोपले आहे ? हा प्रश्न या घडीला ग्रामस्थांना सतावत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त माल लादून बेदरकारपणे धावणाऱ्या अवजड वाहना खाली कुणी चिरडल्यानंतर या खात्याला जाग येणार आहे काय? असा आक्रोश देखील ग्रामस्थ करत आहेत.असे झाल्यास बळी गेलेल्या जिवाची सर्वस्वी जबाबदारी वाहतूक व परिवहन खात्याची असेल असा खणखणीत इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.








Be First to Comment