रक्ताच्या तुटवड्यामुळे ८ ते १० हजार थॅलेसेमिक रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली चिंता…
सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई ।
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, रक्तपेढ्या तसेच सरकारी व निमसरकारी संस्था रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत आहेत व याला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या तेरणा ब्लड बँकेने सुद्धा रक्तदानासाठी आवाहन केले होते व या आवाहनाला नवी मुंबईतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून गेल्या आठ दिवसात शंभरहुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे.
काल १३ डिसेंबर रोजी घणसोली येथे कै. बाळाजी आंबो पाटील, शाळा क्रमांक ४२ येथे नगरसेवक घनःश्याम मढवी मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी २७ नागरिकांनी रक्तदान केले, तसेच श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराज कंत दर्शन दरबार, सेक्टर ६ इथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ४९ नागरिकांनी रक्तदान केले. ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रीएटीव्ह फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व तेरणा ब्लड बँक यांच्या संयुक्त वतीने महारक्तदान शिबीरात ३० नागरिकांनी रक्तदान केले होते. महाराष्ट्रातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी फरफट होत आहे, याच जाणिवेतून तेरणा ब्लड बँक रक्तदान शिबीरांचे आयोजन करीत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना व सोशल डिस्टन्सिंग पाळून करुन तेरणा ब्लड बँक रक्त संकलन करणार असून नवी मुंबईतील खाजगी सरकारी कार्यालये, रहिवाशी ग्रुप, समाजसेवी संस्था यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये दररोज ४५०० ते ५००० रुग्णांना रक्ताची गरज भासते. गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघात ग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. संकलित करण्यात आलेलं रक्त ३५ दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, यामुळेच रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुरेसा साठा करणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये ८ ते १० हजार थॅलेसेमिक रुग्ण आहेत. एकट्या मुंबईमध्ये सुमारे २४०० रुग्ण आहेत, यांच्यासाठी रक्त हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. थॅलेसेमियाच्या मुलांसाठी रक्त ही त्यांची लाईफलाईन आहे. रक्त नाही मिळालं तर हिमोग्लोबिन खाली येऊन त्यांचा जीवही जाऊ शकतो. तातडीने गरज नसलेलं एखादं ऑपरेशन पुढे ढकलता येईल, पण थॅलेसिमिक मुलांना रक्त घेणं टाळता येणार नाही. म्हणूनच लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणं गरजेचं आहे असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे करण्यात आले आहे.








Be First to Comment