

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
गोवा येथे होणाऱ्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले. या निमंत्रणप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी नुकतीच मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गोव्यातील फोंडा येथील फर्मागुडी अभियंता महाविद्यालयाच्या प्रांगणात १७ ते १९ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ ची माहिती दिली.
या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले, “हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. मी याचा अवश्य लाभ घेईन.” या भेटीदरम्यान श्री. वर्तक यांच्यासमवेत महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच भाजपाचे नागपूर येथील आमदार व माजी मंत्री डॉ. परिणय फुके हेही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेताना राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री श्री. भरतशेठ गोगावले हेही उपस्थित होते. त्यांनाही निमंत्रण देण्यात आले असून ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात देशभरातील संत, महंत, धर्माचार्य, विचारवंत आणि धर्मप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असून, सनातन राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून हा कार्यक्रम घडवला जात आहे.

Be First to Comment