सिटी बेल / ठाणे
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटालिया या अलिशान बंगल्याजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे शुक्रवारी दुपारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री १ स्कॉर्पियो अंबानीच्या घराखाली गाडी सापडली होती. या गाडीमध्ये जिलेटीनच्या १७ कांड्या आणि मुकेश अंबानीला परिवारासह धमकीचे पत्र सापडले होते
दरम्यान शुक्रवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्कॉर्पियोचे मालक आणि सीआययूच्या युनिटचे सचिन वझे यांचा संबंध काय या सर्व प्रकरणाची एनआयए चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या पोहोचल्या होत्या.
जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी झटकल्याने एकूणच संशय बळावला होता. आता तर स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सापडल्याने हे सर्व प्रकरण आता गंभीर वळणावर पोहचले आहे. गेल्याच आठवड्यात हिरेन यांनी स्वतः पोलिसांसमोर हजर राहत आपली गाडी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी हिरेन यांच्या कुटूंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. मात्र काही तासांअगोदरच मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.






Be First to Comment