जमिन खरेदी फसवणूक प्रकरणात महाविकास आघाडी मधील नेत्याच्या पुत्राचा गुंतलाय पाय
फसवणूक प्रकरणाचा केंद्र बिंदू प्रविण पाटील मोकाट
सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •
वावंजे येथील जमीन खरेदी फसवणूक प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. एप्रिल १९५२ साली मयत झालेल्या व्यक्तीचा डमी उभा करून,त्यांचे खोटे दस्तावेज बनवून शेतकरी आणि जमीन घेणारे अशा दोघांची फसवणूक केल्याबद्दल खांदेश्वर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. एफ आय आर मध्ये पाच आरोपींचा उल्लेख असला तरी देखील या प्रकरणातील केंद्रबिंदू असणाऱ्या प्रवीण गणपत पाटील चे नाव मात्र एफआयआर मधून वगळण्यात आले आहे. महाविकासआघाडीतील मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे जी आर पाटील यांचा प्रवीण पाटील हा ज्येष्ठ चिरंजीव असल्याचे सूत्रांकडून समजते. राजकीय दबावापोटी प्रवीण पाटील याचे नाव एफ आय आर मध्ये नमूद केले नसल्याची चर्चा पनवेल तालुक्यात सर्वत्र झडत आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे, पनवेल तालुक्यातील वावंजे गाव येथील गट क्रमांक १३८/१ मधील १३ गुंठे जमीन गणपत हरी पाटील यांच्या नावावर होती. गणपत हरी पाटील यांचा मृत्यू १ एप्रिल १९५२ रोजी झाला आहे. सदरची जमीन पाटील कुटुंबीयांनी संगनमताने गणपत हरी पाटील यांचे नातू चांगदेव बारकु पाटील यांना देण्याचे ठरविले.
२०१६ साली चांगदेव बारकू पाटील यांचे निधन झाले.त्यांच्या तीन मुलांच्या नावे सदरची जमीन करण्यासाठी गणपत हरी पाटील यांचे नातू राघो हरी पाटील हे पाठपुरावा घेत होते.२०१७ सालच्या जुलै महिन्यात तलाठी सजा वावंजे यांजकडून ७/१२ उतारा काढला असता त्यावर गणपत हरी पाटील यांचेच नाव होते. परंतु मार्च २०२१ मध्ये सदरचा दाखला पुन्हा काढला असता त्यावर अभिजीत पांडुरंग पाटील यांचे नाव दिसत होते.
राघो पाटील यांनी अधिक पाठपुरावा केला असता. फेरफार क्रमांक ३४३१ अन्वये १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर जमीन दस्त पवल क्र. ३/२८३६/२०१९ नुसार अभिजित पांडुरंग पाटील यांच्या नावावर रजिस्टर झालेली असल्याचे समजले.खोलात जाऊन माहिती घेतली असता त्यांना असे समजले की रघुनाथ चंद्रराव कदम वय 67 वर्षे या सेवानिवृत्त इसमाचा गणपत हरी पाटील यांचा डमी म्हणून वापर करण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे आधार कार्ड,पॅन कार्ड व अन्य दस्तावेज खोटे बनविण्यात आले आहेत.
या प्रकरणात वावंजे येथील भरत दशरथ पाटील, कळंबोली येथील दिलीप अर्जुन पाटील, शाकीर शाबेर सिद्दिकी आणि मुंबईतील धारावी मधला मोहम्मद हा ए खान हे देखील या जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचे सूत्रांकडून समजते.
राघो हरी पाटील यांनी खांदेश्वर पोलीस स्थानकात १८ एप्रिल २०२२ रोजी तक्रार दाखल केलेली असून या पाचही जणांवर आरोपी म्हणून भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३४,४२०, ४६५,४६७,४७१,४६८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.तर जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार अभिजीत पांडुरंग पाटील यांनी २६ ऑगस्ट २०२१ रोजी खांदेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
जमीन खरेदी करणारे अभिजीत पांडुरंग पाटील यांच्याकडे सदरचा प्रस्ताव प्रवीण गणपत पाटील हे घेऊन गेले होते. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवीण तसेच त्यांचे पिताश्री जी आर पाटील यांच्या निदर्शनात हे प्रकरण आणून देण्याचा संबंधितांनी प्रयत्न केला. शेतकरी तथा फसवणूक झालेले अभिजीत पाटील यांना सहकार्य करायचे सोडून या पिता-पुत्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

प्रवीण गणपत पाटील यांनी आणलेल्या या प्रस्तावामध्ये मी १४ ऑगस्ट २०१९ रोजी एक लाख ७० हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ३ येथे व्यवहार पूर्ण केला होता. सदर व्यवहारापोटी धनादेशाद्वारे २५ लाख एक हजार रुपये दिलेले आहेत.तर १४ लाख ९९ हजार रुपये रोख दिलेले असून प्रवीण यास दलाली म्हणून १ लाख ८१ हजार रुपये दिले आहेत.तर कागद हाताळणी साठी २५ हजार रुपये दिले आहेत.सदरच्या व्यवहारापोटी मला ४३ लाख ७६ हजार एवढा खर्च आला. माझी फसवणूक झाल्याचे समजताच मी २६ ऑगस्ट २०१९ रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार माझा जबाब देखील नोंदविण्यात आलेला आहे. तक्रार व जबाब यात या व्यवहाराचा प्रस्ताव माझ्याकडे प्रवीण गणपत पाटील यांनी आणला असल्याचे नमूद आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे मला मानसिक धक्का बसला आहे. फसवणूक ओळखीच्या माणसाने केल्याचे समजल्यानंतर हा धक्का अधिक प्रकर्षाने जाणवतो. या प्रकरणात सर्व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाचे निवेदन मी लवकरच नवी मुंबई परिमंडळ २ चे उपायुक्त यांना देणार आहे.
– अभिजीत पांडुरंग पाटील.

Be First to Comment