Press "Enter" to skip to content

भाजपा पदाधिकाऱ्याचे अपहरण

भाजपा पनवेल तालुका सरचिटणीस अशोक घरत यांचे अपहरण : ५६ दिवस उलटूनही शोध घेण्यास पोलीसांना अपयश

पहा काय म्हणतात अशोक घरत यांच्या पत्नी ज्योती घरत 👇

सिटी बेल • उलवे •

भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका सरचिटणीस अशोक घरत यांचे अपहरण करण्यात आले असून गेल्या तब्बल ५६ दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात पोलीसांना अपयश आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अशोक घरत यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटूंबीयांनी अपहरणकर्त्यांना २५ लाख रूपयांची खंडणी देखील दिली आहे. मात्र तरीही ते अद्याप परतले नाहीत.

दरम्यान अशोक घरत हे पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. अश्या प्रकारे तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचे अपहरण होऊन ५६ दिवस उलटून देखील पक्षीय स्तरावर याची गंभीर दखल घेतलेली दिसुन आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याप्रकरणी अशोक घरत या़चे पुत्र अक्षय घरत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

मी माझे वडील अशोक रघुनाथ धरत ( वय 56 वर्ष ) यांचा बिल्डींग मटेरियल सप्लायचा तसेच स्टोन क्रशर चा व्यवसाय आहे. आमचे स्टोन क्रशरचे व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने
सुमारे 2 वर्षापुर्वी माझ्या वडीलांनी त्यांचे ओळखीचे इसम सुधीर शिंदे यांचेसोबत बोलणे केले होते. त्यावेळी सुधीर शिंदे यांनी त्याचे मित्र सतिश पवार यांची भेट घालून दिली होती. त्यानंतर माझ्या वडीलांनी सतीश पवार यांना आपल्या व्यवसायाकरीता 50 लाख रूपये रकमेची आवश्यकता असल्याचे सांगीतले. 2 वर्षापुर्वी सतीश पवार यांनी माझ्या वडीलांना स्टोन क्रेशरचे व्यवसायासाठी 50 लाख रूपये रक्कम दिली होती.

सदर रकमेपैकी 25 लाख रूपये रोख स्वरूपात तर 25 लाख रूपये बँक खात्यावर ऑनलाईन पाठीवली होती. माझे वडील अशोक घरत व सतिश पवार यांचेतील व्यवहारामधील 25 लाख रूपये रक्कम ही माझे वडीलांनी सतिश पवार यास परत केली होती. व उर्वरीत 25 लाख रु. रक्कम ही आम्ही सतीश पवार यांना देणार होतो. परंतु आम्हास असलेल्या आर्थिक अडचणीमुळे सदरची रक्कम सतिश पवार यांना देण्यास उशीर झाला होता. सतीश पवार हा माझ्या वडीलांना नेहमी फोन करून त्यांचेकडे पैशाची मागणी करीत होता. तसेच तो नेहमी फोनवरून माझे वडीलांना दमदाटी व शिवीगाळी करून त्याचे पैसे परत केले नाहीत तर माझे वडीलांना बघुन घेतो अशी धमकी देत होता.

दि. 31/01/2022 रोजी मी माझे घरी असताना माझे वडील अशोक घरत हे सकाळी 08.00 वा. सुमारास कामानिमत्त घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर साधारण दुपारी 12.00 वा. सुमारास ते परत घरी आले होते. त्यानंतर सकाळी 04. 30 वा. सुमारास ते शेलघर गावाचे नाक्यावर सेक्टर 17 येथे जात असल्याचे सांगुन घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर मी सायंकाळी 05.30 वा. सुमारास आमचे स्टोन क्रशरवर कामानिमीत्त गेलो होतो. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर मी माझ्या घरी आलो त्यावेळी माझे वडील घरी आले होते. त्यावेळी ते घराचे दरवाजातुनच ते शेलघर नाक्यावर जात असल्याचे सांगुन ते त्यांची इनोव्हा कार क्र. एम. एच. / 05/ डी. वाय./7227 ही घेवून बाहेर निघुन गेले होते.

त्यानंतर रात्रौ 08. 30 वा. सुमारास माझे स्टोन क्रशर वरील सुपरवायझर अक्षय लटकर याने मला फोन करून सांगीतले की, माझा लहान भाऊ मोनीश हा माझे वडीलांची वर नमुद इनोव्हा कार घेवून फिरत असल्याचे सांगीतले. त्यानंतर मोनीश याने मला फोन करून त्याचे खर्चासाठी माझेकडे 2 हजार रुपये मागीतले होते परंतु मी त्यास पैसे दिले नव्हते. सदर दिवशी माझे वडील अशोक घरत व भाऊ मोनीश हे दोघेही रात्री उशीरापर्यंत घरी आले नव्हते. त्यामुळे माझे आईने वडीलांचे मोबाईलवर फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता. माझे वडील केव्हा केव्हा त्यांचा मोबाईल बंद करून बाहेर राहत असल्याने आम्ही जास्त विचार न करता झोपी गेलो.

दि. 01/02/2022 रोजी दुपारी 03. 30 या सुमारास माझे मामा सचिन खारकर हे आमचे घरी आले होते. त्यावेळी त्यांनी मला की, माझे वडील सतिश घरत यांना दि. 31/01/2022 रोजी संध्याकाळच्या सुमारास सतिश पवार यांनी उचलून नेले असल्याचे सांगीतले. त्यावेळी मी माझ्या मामास सदरची गोष्ट त्यांना कशी समजली याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला सांगीतले की, माझे लहान काका सचिन घरत यांचे मोबाईलवर माझे वडीलांचे मोबाईल फोनवरून व्हाईस रेकडींग केलेल्या क्लीप त्यांचे मोबाईलचे व्हटसपवर पाठविल्या असून त्यामध्ये माझे वडील अशोक घरत हे बोलत आहे की, “पिठु आता काय बोलतोय मी त्या पुना वाल्या सतीश पवार कडून 50 लाख रुपये घेतले होते. त्याने मला उचलून नेला आहे. त्याला मला 1 करोड़ रूपये द्यायचे आहेत. तु काय पण कर उद्या पैशाचा बंदोबस्त कर मी आलो की मी फ्लॅट नावावर करतो. काय पण करून पैसे दे. फसवायचा प्रयत्न नको करू बाबा. मला यांच्या कडून वाचव मी आलो की तुला प्लॅट लिहून देईन. काय गडबड करू नका गपचुप पैसे जमा करा.” वगैरे मजकुराच्या व्हाईस क्लीप माझे वडीलांनी पाठविल्याचे सांगीतले आहे.

त्यानंतर मी माझा लहान भाऊ मोनीश यास वडीलांचे गाडी त्यास कुठे भेटली याबाबत विचारले असता त्याने मला सांगीतले की त्यास माझे वडीलांची गाडी ही शेलघर गावाचे नाक्यावर से. 17 उलवे याठिकाणी दि. 31/01/2022 रोजी रात्री 08.30 वा. सुमारास चालू स्थितीत मिळुन आली होती. त्यास आमचे वडील कोठे गेले आहेत याचे काहीच माहित नसुन त्याने वडीलांची चालु स्थितीत असलेली गाडी घेवुन तो वडीलांचा शोध घेत असल्याचे सांगीतले. त्यानंतर आम्ही घाबरून जावुन वडीलांचे अपहरण झाले बाबत पोलीसांत तक्रार दिली नाही. परंतु माझे वडीलांचा ठावठिकाणा माहित होत नसल्याने पोलीस ठाणेत तक्रार देणेसाठी आलेलो आहे.

दरम्यान ही तक्रार दाखल करूनही आज ५६ दिवस उलटले तरीही अद्याप पोलीसांना या प्रकरणाचा उलगडा करण्यात व अशोक घरत यांचा शोध घेण्यात यश आले नाही. अशोक घरत यांची पत्नी ज्योती घरत यांनी आपल्या पतीला पोलीसांनी शोधून लवकरात लवकर सुखरूप घरी आणावे यासाठी यासाठी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी याचना करीत आहेत.आता पोलीस या अपहरण प्रकरणी लक्ष देतील का ? तसेच भाजप चे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी हे याकडे किती गांभीर्याने पाहणार याकडे उलवेतील भाजपा कार्यकर्त्यांची आस लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.