Press "Enter" to skip to content

सरकारे बदलली, मात्र मुंबई गोवा महामार्ग अजूनही जीवघेणाच

आधी भाजप – सेनेचे सरकार आता सेना – आघाडीच्या सरकारमध्येही तेच हाल ! जगदीश गायकवाड यांची दोन्ही सरकारवर टीका 🔶🔷🔶

आंदोलनाचा इशारा 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.  महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पाच ते सहा वर्षापासून रेंगाळत सुरु असल्याने मार्गाच्या दुरावस्थेने  प्रवाशी जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.या जीवघेण्या मार्गावरून प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. सरकारे बदलली, मात्र मुंबई गोवा महामार्ग आजही जीवघेणाच आहे, अनेक मंत्री, आमदार , खासदार कोकणात असून ही महामार्ग जैसे थे अवस्थेत आहे, असा संताप व्यक्त करीत  या समस्येवर जलदगतीने तोडगा काढून उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा रिपाइं चे कोकण नेते जगदीश भाई गायकवाड  यांनी दिला आहे.

जगदीश भाई गायकवाड यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत  संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली, व लवकरात लवकर परिस्थितीत सुधारणा करा, अन्यथा रिपाइं जनहीतार्थ प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला. आजघडीला महामार्गावर धुरळा राज दिसत असून प्रवाशी वाहनचालकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. नाकातोंडात धुरळा जात असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.  धुरळा समस्येने  नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. प्रवाशी नागरिकांना नाक, घसा, दमा, श्वासोश्वासाबरोबरच अन्य शारीरिक आजारांची लागण होत असल्याने सर्वानाच याचा मोठा त्रास होत आहे.

याबरोबरच महामार्गावर येणारी जाणारी वेगवान वाहनांचे  धुरल्यामुळे अपघाती घटनात वाढ होत आहे. मात्र या समस्येकडे सबंधित विभाग तसेच ठेकेदाराचे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.  या  महामार्गाचे जलद डांबरीकरण व मजबुतीकरण करावे, तसेच  महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत सकाळ संध्याकाळ योग्य त्या प्रमाणात  पाणी मारावे, व धुळीच्या समस्येवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी गायकवाड   यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात महामार्ग धुरळा मुक्त झाला नाही तर रुग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर  असलेल्या हॉटेल व्यवसायावर गदा आली आहे. धुरळा समस्येने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहक येथील हॉटेलात अल्पोपहार व  भोजनास थांबण्यास नापसंती दर्शवित असल्याने हॉटेल व्यवसाईकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकूणच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग समस्येच्या विळख्यात सापडला आहे. पूर्वी शिवसेना भाजप युतीचे सरकार होते, आता शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकार आहे, मात्र मार्गाच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. या मार्गावर अपघाताची मालिका कायम सुरूच आहे. मुंबई गोवा महामार्गावर आजवर झालेल्या अपघातात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.

महामार्गावर  पावसामुळे पुन्हा एकदा खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांना खड्ड्यातुन प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविताना होणार्‍या अपघाती घटनांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर रस्ता दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातास सबंधित प्रशासन व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

महामार्गावर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवितांना अडथळा येतो. महामार्गावर खड्डे बुजविण्यासाठी सातत्याने टाकण्यात येणारी मुरूम व माती यामुळे धुरळा समस्या अधिक वाढली आहे.  रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती दिसून येत आहे. पावसामुळे या मार्गावर अाता काही ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही जास्त आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकलस्वार कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच मोठ्या खड्यांमध्ये वाहन अापटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.  या मार्गावरील प्रवास म्हणजे जणू नौका नयनाचा प्रवास असल्याचा अनुभव येतोय. रुग्णांचे तर हाल होतातच मात्र गर्भवती महिलांची अवस्था अत्यंत बिकट होत आहे.

मागील वर्षी देखिल या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. या वर्षी काही ठिकाणी रस्ता अजुन सुस्थितीत आहे. परंतू कामाचा निकृष्ठ दर्जा, अवजड वाहने आणि मुसळधार पावसात या रस्त्याचा देखिल टिकाव लागला नाही . त्यामुळे वाहनचालक व प्रवाश्यांना यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा खड्ड्यांचा सामना करावा लागला  आहे. ठिकठिकाणी गावाजवळ बायपास पुलाचे काम सुरु असून अपुर्ण कामामुळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. महामार्गाच्या कामात कोणत्याही प्रकारची सुरक्षा बाळगली जात नसून प्रवाशी वर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

महामार्गावर अनेक ठिकाणी लेनचे काम करण्यासाठी रस्ता दुभागण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे रस्ता दुभागण्यात आला आहे तेथे खड्डे पडले आहेत. किंवा तेथील खडी व डांबर निघाले आहे. त्यामुळे अशा दुभाजकाच्या मार्गावरुन जातांना वाहन चालकांची गैरसोय होते. तसेच अनेक वेळा वाहन येथून घसरतात व अपघाताचा धोका निर्माण होतो.  महामार्गावर अनेक ठिकाणी पक्की साईड पट्टीच नाही अाहे. अनेक ठिकाणी साईड पट्टिवर खड्डे पडेल अाहेत चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी गवत उगवले आहे. यामुळे महामार्गावर वाहनचालकांना गाडी रस्त्याच्या शेजारी नेतांना अडचण येते. बर्याच वेळा ओव्हरटेक करतांना या साईड पट्टिवर फसुन वाहने कलंडून अपघात होतो.

चौपदरीकरणाचे काम सुुरु असल्याने या मार्गावर पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात तर वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडतात. आजघडीला धुरळा समस्या ही ज्वलंत व गंभीर समस्या बनली असून यावर जलद उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी रिपाइं कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड यांनी केली आहे.

यावेळी रोहा तालुका रिपाइं अध्यक्ष संतोष गायकवाड, अलिबाग तालुकाध्यक्ष सुनिल सप्रे, राजकुमार पाटील, सुहास सूर्यवंशी, जगदीश वाघमारे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.