Press "Enter" to skip to content

सर्पदंश झालेल्या आदिवासी रुग्णाचे हाल

आधी कोप्रोली आरोग्य केंद्रात फरफट नंतर डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलने असंवेदनशीलपणा दाखवत मध्यरात्री रुग्णाला दिले हाकलून 🔷🔶🔷

आपली आपबीती सांगताना आदिवासी कुटूंब

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔶🔷🔶

शेतात काम करताना चांदीयली वाडी (चिरनेर) येथील नरेश इक्या कातकरी (वय 55) याला मंगळवार ता.29 रोजी विषारी सापाने दंश केला होता. त्याला उपचारासाठी प्रथम कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तिथं डॉक्टर नसल्याने रुग्णाची स्थिती नाजूक बनत होती. मात्र सुट्टीवरील दुसरे डॉक्टर डॉ. चोरमुळे यांनी धाव घेत प्राथमिक उपचार केले. आणि पुढील उपचारासाठी डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ येथे हलवण्यास सांगितले. त्यांनी संध्याकाळी दाखल करून घेतले पण मध्यरात्री या रुग्णाला आणि त्याचा नातेवाईकांना ICU नसल्याचे सांगत बाहेर काढले. डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळच्या या माणुसकीशून्य कृतीने गरीब असहाय आदिवासी रुग्णांवर उपचार सोडाच पण रात्रभर घरी पायी चालत येण्याचा प्रसंग ओढवला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नरेश यास सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी कोप्रोली आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र तिथं त्या दिवशी कार्यरत असणारं डॉ. राजाराम भोसले उपस्थित नव्हते. डॉक्टर नसल्याने रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यात रुग्णवाहिका नव्हती. सामाजिक कार्यकर्ते आणि जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, पंकज ठाकूर यांना याची माहिती मिळताच त्यांना आरोग्य केंद्रात धाव घेत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना धीर दिला. तत्परतेने याच आरोग्य केंद्राचे सुट्टीवर असलेले दुसरे वैद्यकीय डॉ. चोरमुळे यांना पाचारण केले. त्यांनी रुग्णावर उपचार करून त्यास पुढील खबरदारीसाठी नवी मुंबईत हलवण्यास सांगितले.

नरेश वरील संकट तात्पुरते टळलं असलं तरी त्यास पुढे नेण्याची गरज होती. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने जिव्हाळा फाऊंडेशनचे रुपेश पाटील आणि पंकज ठाकूर यांनी खासगी वाहन घेऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसह नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल गाठलं. आणि उपचार सुरू केले. ते तिथून परतून येताच मध्यरात्री आय सी यु बेड उपलब्ध नसल्याचे सांगत रुग्णाला बाहेर काढलं. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक गयावया करत असूनही या आदिवासींशी रात्रीच्या वेळी माणुसकीशून्य व्यवहार हॉस्पिटलने केला.

याबाबत रुग्णांच्या मुलाने महेंद्र कातकरी याने सांगितले की आम्ही हॉस्पिटलला विनवणी केली. आम्ही अशिक्षित आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत, काय करायचं, कुठं जायचं याची माहिती नाही. मात्र त्यांनी ऐकले नाही. तुम्ही कुठंही जा, काहीही करा आम्हांला काहीही घेणं देणं नाही, असं सांगत हाकलून दिलं. तिथून आम्ही घरी आलो आहोत.

डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या या माणुसकीशून्य कृतीने रुग्णाचा हात निकामी होण्याची शक्यता फ्रेंड्स ऑफ नेचरचे जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामचुकार डॉक्टर राजाराम भोसले याचा कर्तव्यात कसूर करण्याबाबत तसेच डॉ. डी वाय पाटील रुग्णालय नेरुळ यांची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आदिवासी मंत्री तसेच आरोग्य विभागाला करणार असल्याचे सांगत प्रसंगी उपचारात हयगय करणाऱ्या असंवेदनशील हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जिव्हाळा फाऊंडेशनचे रुपेश पाटील यांनी सांगितले.

जिव्हाळा फाऊंडेशन आणि फ्रेंड्स ऑफ नेचरची टीम दुसऱ्या दिवशी आदिवासी वाडीवर त्याला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्यासाठी गेली. पण कालच्या घटनेने घाबरलेल्या, हॉस्पिटलच्या माणुसकीशून्य व्यवहाराने धक्का बसलेला नरेश कातकरी खूप समजूत घालूनही स्वतःवर उपचार करवून घेण्यास तयार झाला नाही.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आम्हीच त्यांना उपचारासाठी तिथं दाखल केले होते. उपचार सुरूही केले होते. त्यांनतर रुग्ण आणि नातेवाईकांना तिथंच ठेवून आम्ही घरी आलो. मात्र आमची पाठ फिरताच उपचाराची गरज असलेल्या त्या गरीब, असहाय, आदिवासी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मध्यरात्री हॉस्पिटल बाहेर काढलं. मला रात्री कळताच तिथल्या डॉक्टरांना मी फटकारले होतं पण त्यांनी फोन कट केला. वाटलं की इतके असंवेदनशील होणार नाहीत. या कृत्याबद्दल डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल प्रशासनाचा मी धिक्कार करतो.. स्थानिक भूमीपुत्रांच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर ही हॉस्पिटल उभी राहिलीत त्यांनी तिथल्याच जनतेला उपचार नाकारणे, हाकलून देणं हा कृतघ्नपणा आहे. याची किमंत त्यांना चुकवावी लागणार..

रुपेश पाटील
अध्यक्ष- जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.