Press "Enter" to skip to content

मराठा आरक्षणाला आमदार महेश बालदी यांचा जाहीर पाठिंबा

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔶🔷

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता राज्यात पेटला असून मराठा आरक्षण प्रकरणी मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. आरक्षण व इतर महत्वाच्या मागण्यासाठी राज्यात अनेक आंदोलने, संप झाली मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही मराठा आरक्षणाला वेळोवेळी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून व मराठा समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळावे म्हणून रायगड जिल्ह्यातील व नवी मुंबईला लागून असलेल्या उरण तालुक्यातील भाजपचे नेते तथा उरण विधानसभेचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्हा समन्वयक यांना पत्रव्यवहाराद्वारे मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक यांना महेश बालदी यांनी पत्रव्यवहार करून मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजास महाराष्ट्र विधान मंडळात अंतर्गत कायदा करून आरक्षण देण्यात आले परंतु सदर आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यास स्थगिती मिळाल्याने मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा व सवलतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचवेळी राज्यसरकारच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीच्या प्रक्रिया चालू झाल्याने मराठा समाजापुढे उभे राहिलेले प्रश्न सोडविण्याबाबत मी लोकप्रतिनिधी म्हणून याचा विधानमंडळ व आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे अभिवचन देतो. असे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी आपल्या जाहीर पाठिंबाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकर भरती संदर्भात पेचप्रसंग उभा राहिला असल्याने सदर स्थगिती उठविण्यासंदर्भात मी स्वतः प्रयत्नशील राहून मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे असेही सदर प्रसिद्धी पत्रकात आमदार महेश बालदी यांनी नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.