Press "Enter" to skip to content

कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास होणार

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔶🔷🔷🔶

कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीकोनातून प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र इको टूरिझम डेव्हलपमेंट बोर्डकडे तात्काळ पाठवावेत, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

फणसाड अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य व माथेरान येथील वनक्षेत्र परिसरातील वनसंवर्धन व ही पर्यटनस्थळे अधिक विकसित करण्याच्यादृष्टीने राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, नैसर्गिक देणगी लाभलेली ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक निवास सोयी-सुविधा व व्यापक प्रसिद्धी मिळाल्यास कोरोनानंतरच्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतील. रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या औद्योगिक विस्तारानुसार दिवसेंदिवस येथील लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निसर्ग पर्यटनाला चालना देऊन या अभयारण्यातील आर्थिक उत्पनात भर पडण्यास मदत होईल, असे यावेळी कु. तटकरे म्हणाल्या. त्याअनुषंगाने पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक स्वच्छतागृहे, खाण्यापिण्याच्या व राहण्याच्या सोयी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाव्यात, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

या स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथला आराखडा, वनक्षेत्र यांची प्रत्यक्ष पाहणी करुन तसा प्रस्ताव इको टुरिझम बोर्डास सादर करण्यासाठी नियोजनपूर्वक पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यमंत्री भरणे यांनी लिमये यांना दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.