Press "Enter" to skip to content

फेक न्यूज पसरविण्यासाठी भारतात पोषक वातावरण

केवळ शारीरिक अंतरच नाही तर फेक न्यूजपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन !!  🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔶🔷🔷🔶

जागतिक पातळीवरील  कोरोनाव्हायरसमुळे  होणाऱ्या नुकसानाची तसेच वाढलेल्या मृत्यू दराच्या  बातम्या आपण रोजच ऐकत असतो, त्यामुळे जोपर्यंत  कोरोनावर ठोस लस येत नाही तोपर्यंत तोंडावर  मास्क लावणे, घराबाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेवणे, गरज असेल तरच घराबाहेर जाणे या त्रिसूत्रीचा वापर आपण केला पाहिजे परंतु यासोबतच सोशल मिडियाच्या माध्यमातून येणाऱ्या फेक न्यूजपासून लांब राहण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात येत आहे.

भारतात फेक न्यूज किंवा खोट्या बातम्यांचा प्रसार हा कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणापेक्षाही अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने होत आहे. देशात कोरोनाचा साथीसोबतच  सोशल मीडियावर खोट्या पोस्ट,अफवा, कपोलकल्पित षडयत्रांच्या विविध थेअरी, कोरोना  विषाणूचा उगम, त्याचा प्रसार, त्यावरचे उपचार याबाबतच्या खोडसाळ व्हिडिओं तसेच बातम्यांनी  थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक वेळा या बातम्या खऱ्या समजून अनेक नागरिकांमध्ये कोरोनाविषयी गैरसमज वाढत आहेत.

 याविषयी अधिक माहिती देताना बोरिवलीच्या अ‍ॅपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मानसोपचारतज्ज्ञ,( एमडी) मनोचिकित्सक डॉ. प्रतीक सुरंदशे सांगतात, “ कोरोना या महामारीमुळे  सर्वत्र चिंता व भीतीचे वातावरण आहे  यांसोबत आपल्याला आजाराची लागण झाली अथवा या कोरोनामुळे आपल्या कुटुंबीयाचे काय होईल या चिंतेने अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत, म्हणूनच सोशल मिडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोरोना संबंधित बातम्या नक्कीच टाळल्या पाहिजेत कारण खोट्या बातम्या या खऱ्या बातम्यापेक्षा जास्त जलदगतीने पोहचत असतात.

गेल्या सहा महिन्यात तर अनेक चित्रपट तसेच अनेक नामांकित व्यक्तींच्या मृत्यूच्या खोट्या  बातम्या आपण पाहत आलो आहोत. यासोबतच कोरोनावर उपचार यासंबंधित अनेक खोट्या  बातम्या पसरविल्या जातात व अनेक नागरिक याला बळी पडतात. अशा खोट्या अपप्रचाराला आपण प्रोत्साहित न करणे हे आपल्या हातात आहे कारण कोरोना संक्रमणामध्ये भारतातल्या सर्वच नागरिक मानसिक ताणतणावातून जात आहेत.

फेक न्यूजचा विषाणू हा काही केवळ भारतातच थैमान घालतोय असा नाही. कोरोना महामारीचा सामना करताना, अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या महापूराचा सामना संपूर्ण जगाला देखील करावा लागतोय. विषाणूचा उगम, त्याचा प्रसार आणि त्यामुळे निर्माण होणारा धोका याबाबत पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे जवळपास सर्वच देश कमी अधिक प्रमाणात घेरले गेलेत. 

हृदयविकार व खोट्या बातम्या याचे विश्लेषण करताना  ज्येष्ठ हृदयविकार तज्ञ व शुश्रूषा हार्ट केअर आणि मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ संजय तारळेकर  सांगतात , “ जगभरात कोरोनाव्हायरसच्या अतिक्रमणामुळे सर्वजण चिंतेत आहेत परंतु हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांकडे  आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण त्यांना कोविड -१९ चा संसर्ग  होण्याचा जास्त धोका असतो. कोरोना विषाणूचा श्वसन प्रणालीवर प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होत असतो परंतु  हृदयावरती दुष्परिणाम होऊ शकतो, विशेषत: हृदयविकार असलेल्या हृदयाला शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त मिळवण्यासाठी अधिक धडपड करावी लागत असते  म्हणूनच, हृदयरोग्यांना धोका कमी करण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.  

यासोबतच हृदयरोग्यांना खोट्या बातम्या किंवा बनावट विडीओपासून  दूर ठेवणे आवश्यक आहे, कारण यामुळे त्यांच्यात चिंता आणि भय निर्माण होते. बर्‍याच वैद्यकीय अभ्यासकांनी हृदयरोग आणि नैराश्याला जोडले आहे,  कित्येक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराच्या जवळजवळ एक  चतुर्थांश लोकांमध्ये एक प्रकारची चिंता असते आणि काही प्रकरणांमध्ये  नैराश्यामुळे हृदयाची स्थिती अधिकच बिकट  होते.

“भारतासारख्या देशात जिथे सोशल मीडिया अधिक झपाट्याने वाढत आहे. मात्र त्याला नियंत्रित करू शकणारी मार्गदर्शक तत्वे अगदीच कमकुवत असल्याने फेक न्यूजबाबतचा गोंधळ अधिक गंभीर स्वरूप घेतो. भारतात ४० कोटीहून अधिक नागरिक  सोशल मीडियाचा वापर करतात, त्यामुळेच भारत हा सोशल मीडिया कंपन्यांच्या रडारवर आहे. जगातील इतर देशांची तुलना केल्यास फेक न्यूज पसरविण्यासाठी  भारतात अधिक पोषक असल्याचे दिसून आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.