बरडशेवाळा बीटचे “ज्ञानसंस्कार” ऑनलाईन डिजीटल मासिकाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न ###
सिटी बेल लाइव्ह / नांदेड :- (प्रतिनिधी ) ###
प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत हदगाव तालुका नेहमीच अग्रेसर असतो. यावर्षी देखील हदगाव तालुक्यात शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम ऑनलाईन डिजिटल माध्यमातून सुरु आहे. गाव पातळीवरील, वाडी-वस्त्यांवरील सर्व विदयार्थी शिक्षणप्रवाहात रहावी म्हणून शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बरडशेवाळा बीटने शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयोगी असे ई डिजिटल मासिक ज्ञानसंस्कार नुकतेच तयार करुन त्याचे वेबिनारच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रकाशन केले.
सदरील कार्यक्रमास नांदेड डायटच्या प्राचार्या श्रीमती जयश्री आठवले मॅडम, जिल्हा परिषद नांदेडचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. प्रशांत दिग्रसकर साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री. डी. एस. मठपती साहेब, हदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. आर. एल. ससाणे साहेब, बरडशेवाळा बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. व्ही. एस. आडगांवकर मॅडम, चिंचगव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. एस. डब्ल्यू. गोडघासे, डायटचे आयटी विषय सहायक श्री. संतोष केंद्रे या मासिकाची संकल्पना व निर्मिती करणारे शिबदरा येथील सहशिक्षक श्री. श्यामसुंदर सुपलकर यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रिय मुख्याध्यापक, अंतर्गत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
सदरील ज्ञानसंसस्कार ई मासिकाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. प्रशांत दिग्रसकर साहेब यांनी प्रकाशन करुन विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणा-या या उपक्रमाचे कौतुक केले. सदरील मासिक दरमहा प्रकाशित केले जाणार असून यात विदयार्थ्यांचे स्वरचित लेख, कविता, कथा प्रकाशित केल्या जाणार आहेत. या कामासाठी ऑनलाईन उपस्थित असलेल्या प्राचार्य जयश्री आठवले मॅडम, उपशिक्षणाधिकारी डी. एस. मठपती साहेब, गटशिक्षणाधिकारी आर. एल. ससाणे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. व्ही. एस. आडगांवकर मॅडम यांनी शुभेच्छा संदेशातून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डायटचे श्री. संतोष केंद्रे यांनी केले तर ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्वांचे केंद्रप्रमुख श्री. एस. डब्ल्यू. गोडघासे यांनी आभार मानले.
Be First to Comment