Press "Enter" to skip to content

अग्रीमा जोशुआ या विकृत कॉमेडियन युवतीला अटक करा

हिंदुस्थानातील राष्ट्र पुरुषांची व महिलांची बदनामी करणाऱ्या स्टँड-अप् कॉमेडी शोवर कायमची बंदी घालण्याची आमदार डॉ मनीषा कायंदे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / मुंबई- ###

आजच्या तरुण पिढीला सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे व या वेडापायी आपण कोणत्या व्यक्तिविषयी काय बोलत आहोत यावर काहीही ताळतंत्र राहिलेला नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आज अनेक स्टॅन्ड अप कॉमेडी शो मध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती तसेच हिंदुस्थानातील थोर विचारवंत, महिला, राष्ट्रपुरुष व अनेक वेळा एखाद्या समाजाची नाहक बदनामी वेळोवेळी होत असते. नुकतीच कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिने सुद्धा कलेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून या विकृत कॉमेडियन युवतीला अटक करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले आहे. याविषयी अधिक माहिती देताना डॉ मनीषा कायंदे सांगतात, ” श्याम रंगीला हे नाव २०१७ पूर्वी कोणालाच माहीत नव्हते परंतु भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व त्यावेळी असलेले काँग्रेसचे अध्यक्ष श्री राहुल गांधी यांची हुबेहूब नक्कल करून श्याम रंगीला हा युवक एका स्टँड अप कॉमेडी शोमधून रातोरात प्रसिद्धीस आला. शॉर्टकट मार्गाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टँड अप कॉमेडीकडे आजचा तरुण वर्ग वळू लागला आहे. अगदी १६ -१७ वर्षांची मुले युट्युब फेसबुक व इतर सोशल मीडियांच्या माध्यमातून स्टँड अप कॉमेडीचा आसरा प्रसिद्धीसाठी शोधू लागले आहेत. अल्पावधीतच एक कॉमेडियन स्टार बनण्याच्या स्पर्धेत आजचा तरुण वर्ग उतरला आहे. वास्तवात या विद्यार्थ्याचे वाचन व चिंतन खूपच कमी असते त्यामुळे टाळ्या मिळवण्यासाठी ही मुले अपुऱ्या माहितीच्या आधारावर तसेच इतिहासातील घटनांवर विनोद निर्मिती करतात व कळत नकळत यांच्याकडून राष्ट्रपुरुष तर कधी एखाद्या समाजाचा जाहीर अपमान होत असतो. कधी कधी तर रामायण व महाभारत ग्रंथातील व्यक्तींवर कॉमेडी होताना दिसते. आज मुंबई पुण्यातील अनेक खाजगी हॉटेल्समध्ये हे स्टॅन्ड अप कॉमेडी शो तिकीट घेऊन आयोजित केले जातात व अशा कॉमेडी शो ला अनेक नागरिकांची उपस्थिती असते कारण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे कॉमेडी शो अनेकांचा मानसिक ताणतणाव हलका करण्यास मदत करतात परंतु या स्टॅन्ड अप कॉमेडी शो मध्ये व्यक्त केले जाणारे विनोद यावर कोणाचेही नियंत्रण नसते व त्यामुळेच अग्रीमा जोशुआसारखे विकृत मानसिकतेचे कलाकार अनेकवेळा राष्ट्रपुरुष व महिलांचा अपमान करतात म्हणूनच या कार्यक्रमांना सेन्सॉरशिप लावणे आता गरजेचे झाले आहे. सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवण्यासाठी या मुलांना आपण काय करत आहोत तसेच कोणाविषयी बोलत आहोत याचे भान स्टँड अप कॉमेडी शो करताना राहत नाही म्हणूनच राष्ट्रपुरुष व महिलांवर विनोद करीत असलेल्या स्टँड अप कॉमेडी शोवर व त्या कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.