Press "Enter" to skip to content

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

योग्यवेळी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून राजकारणावर देखील बोलणार 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔶🔷🔷🔶

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला.

राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.


मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा ही त्रिसूत्री पाळा


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत. मिशन बिगिन अगेनअंतर्गत काही गोष्टी सुरु केल्या आहेत. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. वाहतुकीचे निर्बंध शिथिल केले आहेत. आयुष्याची गाडी मागावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.


अनेक संकटं महाराष्ट्रावर आली. कोरोनासोबत, पाऊस, विदर्भातील पूर अशी स्थिती अशी संकटं महाराष्ट्रावर आली आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.