Press "Enter" to skip to content

‘रोज मरे त्यास कोण रडे’ अशी शेतकरी आत्महत्याची अवस्था!-ॲड रेवण भोसले



सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद : 🔷🔶🔷🔶

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर प्रसार माध्यमे व वृत्तपत्रात जेवढी चर्चा झाली तेवढी गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात 1250 पेक्षा शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाले असतानाही ना त्याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष दिले ना केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने घेतले, अर्थात कोणतीही आत्महत्याही वाईटच असते परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी ‘रोज मरे त्यास कोण रडे’ अशी अवस्था असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खाजगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा व कोरोनाचा फटका यामुळे लॉक डाऊन दरम्यान मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात 11 98 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ,यापैकी फक्त 450 शेतकऱ्यांच्या वारसदारांना सरकारी मदत मिळाली आहे. कोरोना संकट, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. सरकार व विरोधक हे दोघेही एकमेकांची उणी-दुणी काढण्यामध्येच दंग आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांचे हाल होत आहेत . कलाकारांच्या आत्महत्यांची चर्चा होते परंतु शशेतकर्‍यांची मुलं या सरकार व प्रशासनात असूनसुद्धा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चा होत नाही हे दुर्दैव आहे. या सर्व परिस्थितीसाठी राज्य व केंद्र सरकार जबाबदार असून आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने शेतकरी आत्महत्येकडे दुर्लक्ष केले आहे.

लॉकडाउन काळात शेतमालाची पुरवठा व्यवस्था कोलमडली होती. सरकारने बाजार समित्या सुरू करण्याबाबतही धरसोड निर्णय घेतले, त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून पिकवलेला नाशवंत पीक खराब झाले. केंद्र सरकारने सर्व जुन्याच योजना नव्या वेष्टनात गुंडाळून पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला हे सांगणेही कठीण आहे. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांच्या खिशात पैसा असणे गरजेचं होतं परंतु त्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केलं. त्यातच शेतकऱ्यांना बँकाकडून 25% ही कर्ज पुरवठा झालेला नाही. शेतकऱ्याला कोणतच सरकार महत्त्व देत नाही . 1970- 80 च्या दशकात शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच निवडणुका होत असत परंतु आता निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या मताला किंमत उरलेली नाही. त्यामुळे एकीकडे कलाकारांच्या आत्महत्येवर देश पातळीवर चर्चा होते परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्यावर चर्चा होत नाही असे स्पष्टपणे दिसत असून’ रोज मरे त्याला कोण रडे ‘असे अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याची खंतही ॲड भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.