Press "Enter" to skip to content

अब मै चल पडा मेरे राह की ओर..अलविदा ! असे का म्हणाले तुकाराम मुंढे

सिटी बेल लाइव्ह / नागपूर : 🔶🔷🔶🔷

कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात हे आदेश मागे घेतले आहेत. त्यांची नियुक्ती नेमकी कुठे केली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले. ‘अब मै चल पडा मेरे राह की ओर….’अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचा निरोप घेतला.

तुकाराम मुंढे यांची फेसबुक पोस्ट

‘नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी तुमचा निरोप घेत आहे.या सात महिन्यात मी या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरु आहेत. तर काही अद्याप सुरु झालेले नाहीत. मात्र त्यातच माझी ट्रान्सफर झाली. अब मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार मी पुढील कामकाजासाठी सर्वांचा निरोप घेत आहे.

नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रती असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला, याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जिथे कुठे असेन, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…! अलविदा…!’ अशी पोस्ट तुकाराम मुंढे यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.