Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई ची मागणी

मायीच्या दुधाला आणि बापाच्या मिठाला जागा ###

कृषी सेवा केंद्र चालकांंनो संपातुन बाहेर पडा ###

शेतकरी संघटनेचे आवाहन ###

सिटी बेल लाईव्ह/ सोनपेठ ###

मढे झाकुनिया करिती पेरणी, कुणबीयाची वाणी लवलाहे, तयापरी करा स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह.”

पेरणीची वेळ असेल आणि घरात कोणाचा मृत्यू झाला असला तरी शेतकरी त्याचे मढे झाकुन आधी पेरणी आटपुन घेतो कारण पेरणी जर साधली नाही तर येणारा संपुर्ण हंगाम वाया जाण्याचा धोका असतो.

चालु हंगामात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही म्हणुन राज्यभर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या .पेरलेले न उगवणे म्हणजे पोटच्या पोराच्या मरणा एवढे दुख शेतकऱ्यांना होते.

सहाजिकच या तक्रारी शेतकरी ज्या दुकानदाराकडुन घेतले त्या दुकानदारा कडे च करणार . घडलेल्या प्रकारात पहिल्यांदा ज्या दुकानातुन बियाणे घेतले त्या दुकानदारावर रोष व्यक्त केल्या जातो . शेतकऱ्याला वाटते आपण वर्षानुवर्षे ज्या दुकानातुन आपण बियाणे घेतो त्या दुकानदाराने आपल्या दर्जेदारच बियाणे द्यावे अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांची असते.
रक्ताचे पाणी करुन पेरलेले सोयाबीन उगवले नाही तर त्याचा संताप होणारच तो त्रागा करणारच.
न उगवलेल्या सोयाबीनचे दोषी कोण ?
तर किचकट कायदेशीर प्रक्रीया ,कायद्याचा किस पाडल्यानंतर शेतकऱ्याला चुकीच्या पध्दतीने पेरणी व बियाणे हाताळणीसाठी दोषी धरुन शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसण्यात येणार आहे .
सगळ्या बियाणे कंपन्या त्यांचे अधिकारी बीज प्रमाणिकरण अधिकारी यांना ठाम विश्वास आहे त्यांचे काहीही वाकडे होणार नाही .कारण तसा कायदाच या देशात अस्तित्वात नाही.
एकीकडे अमेरीकेत धोक्याची सुचना छापली नाही म्हणुन कंपन्यावर करोडो डॉलर ची नुकसान भरपाई बसते दुसरीकडे भारतात कायदा नाही म्हणुन शेतकऱ्यांना दमडी ही मिळणार नाही.

नुकसान भरपाईचा कायदेशीर कारवाई चा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही याची पुर्ण कल्पना असतांंना सरकार फक्त शेतकऱ्यांचा क्षोभ शांत करण्यासाठी कंपन्यावर व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाईचे आदेश काढते .

सरकारी परवाना काढुन सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेलेच बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर अन्याय होतो हे शंभर टक्के मान्य आहे पण याला जबाबदार दुकानदारच आहेत . गुण नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीमागच्या खोलीत नेऊन गुण दागवल्यामुळेच दुकानदारांवर ही वेळ आली आहे.

राज्यातील बहुतांश दुकानदार ही शेतकरी आई बापाची पोर आहेत. बापाच्या जन्मोजन्मीचा दुर्दैवी कर्जबाजारी धंदा सोडुन चार पैसे मिळवण्यासाठी त्यांनी हा धंदा टाकला आहे.
महात्मा ज्योतीबा फुल्यांना वाटल होत कुणब्याची पोर शिकतील ल अधिकारी होतील तर कुणब्याची जी लुट अधिकारी कर्मचारी ब्राम्हणाकडुन होते ती कमी होईल .
तसे शेतकऱ्यांची पोर कृषी सेवा केंद्राच्या धंद्यात आली तर शेतकऱ्यांची लुट कमी होईल अस वाटल पण तस झाल नाही उलट शेतकऱ्यांची लुट वाढली असे वाटते.

राज्य शासनाच्या वतीने बोगस बियाणे विकले म्हणुन दुकानदारांवर कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ कृषी सेवा केंद्रावाले तीन दिवस दुकान बंद ठेवणार आहेत . खर पाहिले तर हा दुकानदारांचा हा बंद सरकार विरुध्द नसुन ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर कृषी सेवा केंद्रांचे पोट चालते त्यांच्या विरुध्द आहे .

शेतकऱ्यांनी आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध आवाजच उठवु नये यासाठी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या बोगस बियाण्यात अडकलेल्या अधिकारी कर्मचारी व कंपन्याकडुन होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्याच पोरांच्या खांद्यावर ही संपाची बंदुक दिली आहे. ऐन हंगामात आधीच दुबार पेरणीने नडलेल्या शेतकऱ्यांना युरीयासाठी वेठीस धरल्या जात आहे.
दारुत भेसळ होत नाही मग बियाण्यात भेसळ का असा प्रश्न विचारुन तरुण शेतकरी बोगस बियाण्यामुळे आत्महत्या करत आहेत .
अशा गंभीर परिस्थितीत ज्या आई बापाच दुख दुर व्हाव म्हणुन बापाचा कष्टाचा शेतीचा धंदा सोडुन कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी मायीच दूध व बापाच्या मीठाला जागाव व या संपातुन बाहेर पडुन न उगवलेल्या सोयाबीनच्या नुकसान भरपाईसाठी व शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई ची मागणी करावी

सुधीर सुधाकरराव बिंदू
शेतकरी संघटना
सोनपेठ
मो.9923049007
E-mail :- ssbindu@gmail.com

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.