Press "Enter" to skip to content

ऑनलाइन सात बारा चा उतारा झाला सुटसुटीत

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔶🔷

राज्यातील सातबारा आता सुटसुटीत झाला आहे. राज्यात सात-बारा उताऱ्यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. आता सातबारा साधा, सहज समजेल अशा भाषेत असणार आहे. त्यावर क्यूआर कोडही असणार आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात विविध प्रकारचे ११ बदल सुचविण्यात आले आहेत.ऑनलाईन सातबार्‍यात सुचविण्यात आलेले 11 बदल करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या आदेशाची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली असून तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी असलेला ऑनलाईन सातबाराही सहज उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाने 23 जानेवारी 2013 पासून ऑनलाईन सातबारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. दि. 31 जुलै 2017 पासून हस्तलिखित सातबारा उतार्‍यांचे वितरण बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑनलाईन सातबारा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विविध मुहूर्त सांगण्यात येत होते.अखेर 1 ऑगस्ट 2020 पासून तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला आहे.

काही ठिकाणी अद्याप ऑनलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे काही उतारे अद्याप ऑनलाईन उपलब्ध होणार नसल्याचेही स्पष्ट आहे. गाव नमुना नंबर 7 हा अधिकार अभिलेख आणि गाव नमुना नंबर 12 हा पिकांची नोंदवही असलेला सातबारा उतारा अधिक सुटसुटीत करावा. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना तो सहजपणे समजेल, असे त्याचे स्वरूप असावे, अशी मागणी होती.

त्यानुसार राज्य शासनाला तशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. हा सातबारा समजण्यास अधिक सोपा व्हावा, यासाठी राज्य शासनाने या सातबारा उतार्‍यावरील गाव नमुना नंबर सातमधील अधिकार अभिलेखात 11 बदल करण्यात आले आहेत. यामुळे हा सातबारा अधिक सोपा झाल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. या आदेशाची तातडीने अमंलबजावणी करण्याची सूचनाही सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहेत.

सातबारा उतार्‍यात हे करण्यात आले आहेत बदल

गावाच्या नावासोबत त्या गावाचा ‘लोकल गर्व्हंमेंट डिरेक्टरी कोड’ दिसणार. लागवडी योग्य व पोट खराब क्षेत्र या सोबत हे दोन्हीचे एकत्रित क्षेत्रही दिसणार. शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर हे एकक तर बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हे एकक वापरले जाणार. यापूर्वी इतर हक्कात नोंद केलेला खातेक्रमांक आता खातेदारांच्या नावापुढे दिसणार. कमी केलेली नावे, बोजा अन्य नोंदींना कंस केला जात होता. यापुढे त्यावर रेषा मारून खोडून दर्शवण्यात येतील. प्रलबिंत फेरफार असल्यास इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दिसणार, एकही प्रलबिंत फेरफार नसल्यास फेरफार प्रलंबित नाही असे दिसणार. इतर हक्क रकान्यात शेवटचा फेरफार दिसणार. यापूर्वीचे जुने फेरफार सर्वात शेवटच्या रकान्यात दिसणार. कोणत्याही दोन खातेदारांच्या नावात डॉटेट लाईन छापली जाणार आहे, त्यामुळे खातेदारांच्या नावात सुसुत्रता आणि स्पष्टता येणार. बिनशेतीच्या उतार्‍यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी तसेच इतर हक्कातील कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.