Press "Enter" to skip to content

अखेर.. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला मिळणार प्राणवायू

90 बेडला मिळणार ऑक्सिजनची सुविधा : रुग्णांची परवड थांबण्याची आशा ###


सिटी बेल लाइव्ह / पनवेल / संजय कदम ###

पनवेल उपजिल्हा रुग्णालय एकूण दीडशे पैकी 90 बेडला ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. त्या कामाला सुरुवात झाली असून दोन ते तीन दिवसात ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना रुग्णांची परवड थांबणार आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करता येणार आहे. 
        पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा तीन हजारांच्या हीवर पोहोचला आहे. तसेच ग्रामीण भागातही जवळपास एक हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. दररोज त्यामध्ये भर पडत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी होत  होती. पनवेल उपजिल्हा रुग्णालय व कामोठे एमजीएम या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेड ची कमतरता असल्याची वस्तुस्थिती समोर आली होती. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्णांना सुद्धा आवश्यक तेवढे उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत होते. विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह याशिवाय वयोवृद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची आवश्यकता आहे. परंतु या सुविधांची कमतरता असल्याने गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करताना अडचणी येत होत्या. ऑक्सीजन बेड नसल्याने अनेकदा कोविड रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. कोरोना  झालेल्या रुग्णांना ठणठणीत बरे करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी केले होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात 90 बेडला ऑक्सिजनची सुविधा करण्यात येणार आहे. त्या कामाला सुरुवात झाली आहे.
चौकटरुग्णांची गैरसोय कमी होणार
ऑक्सीजन बेड तुलनेत कमी आहेत. त्यामुळे अनेकदा ऑक्सिजनची सुविधा नसल्याने रुग्णांना कोविड  रुग्णालयात ऍडमिट करून घेता येत नव्हते परिणामी त्यांना इतरत्र म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावी लागते. त्या ठिकाणी उपचार घेणे सर्वांच्या खिशाला परवडते असे नाही. त्याच बरोबर आता खाजगी रुग्णालयात आहे बेड शिल्लक नाहीत. विशेष करून इतर आजार असणारे आणि वृद्ध कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड ची आवश्यकता असते. नेमकी त्याची पनवेल येथील कोविड रुग्णालयात कमतरता होती. परंतु अशा प्रकारचे एकूण 90 बेड उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी ऑक्सीजन असलेल्या रुग्णांना ऍडमिट करून घेतले जाईल. प्रकृती ठिक असलेल्या कोरोना रुग्णांवर इंडियाबुल्स येथे उपचार करण्याचा प्रस्ताव असल्याचेही ते म्हणाले.

अतिदक्षता विभागही  कार्यान्वित
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागातील 10 व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी चार इतर अतिगंभीर अवस्थेतील रुग्णांकरिता वापरले जाणार आहेत. त्याचबरोबर दहा डायलेसिस मशीन कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. परिणामी किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना चांगली सोय झालेली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.