Press "Enter" to skip to content

‘बिग बटरफ्लाय’ सप्टेंबर महिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶

आपल्या देशात प्रथमच असे घडते आहे की संपूर्ण देशातील फुलपाखरू तज्ञ, फुलपाखरांचे उत्साही अभ्यासक तसेच जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणार्‍या अनेक संस्था मिळून फुलपाखरांचा विशेष महिना साजरा करतील.

दिनांक १५ ते २० सप्टेंबर २०२० दरम्यान फुलपाखरांची महागणना, फुलपाखरांसंबंधीची ऑनलाइन कार्यशाळा, फुलपाखरांची बाग उभारणी कार्यशाळा, तसेच फुलपाखरांचे छायाचित्रण, फुलपाखरांसंबंधीचे लिखाण, प्रश्नमंजुषा, फुलपाखरांचे चलचित्रण, तसेच फुलपाखरांच्या जीवनचक्राचा अभ्यास इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

१५ ते २० सप्टेंबर २०२० दरम्यान संपूर्ण भारतात फुलपाखरांची महागणना आयोजित करण्यात येत असून यामध्ये सर्व सहभागींनी त्यांनी केलेल्या नोंदी या inaturalist सारख्या विविध संकेतस्थळावर अपलोड करावयाच्या आहेत. या उत्सवामध्ये विविध स्पर्धा तसेच आयोजक संस्थांद्वारा जनसंपर्क साधण्यासाठी फुलपाखरांसंबंधीच्या विविध जनप्रबोधन कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन केल्या जाईल. अशा कार्यक्रमांचे संपूर्ण भारतभर होणार असून owls मार्फत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड,ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

निसर्गामध्ये फुलपाखरांची अनन्यसाधारण भूमिका आहे. कोळी, गांधील माशा, चतुर, पक्षी, तसेच विविध प्रजातीच्या सरड्यांचे खाद्य म्हणून फुलपाखरे महत्त्वाची भूमिका बजावतात.
आपल्या देशातील सर्व फुलपाखरू प्रेमींना एका ठिकाणी आणून आपल्या देशातील फुलपाखरांच्या अधिवासांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे तसेच नवीन अधिवास निर्मितीसाठी झटणे हे ‘बिग बटरफ्लाय’ महिना या कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये भारतातील स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने विविध परिसंस्थांचा आज आवश्यक असलेला विकास होईल.

जनसहभागातून विज्ञानाची लोकप्रियता व व्याप्ती अमर्यादित आहे.प्रचंड संख्येत असलेल्या जन सहभागमुळे भौगोलिक दृष्ट्या सुदुरच्या प्रदेशातील फार मोठी वैज्ञानिक माहिती उपलब्ध होते. याउलट शास्त्रज्ञ मात्र शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक माहिती मिळवतात. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती मिळविणे शास्त्रज्ञांना शक्य होत नाही.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) चे श्री सोहेल मदान म्हणतात की “आपण ज्या युगात जगतो आहोत त्या युगात आपल्याला असलेल्या माहितीचे अवलोकन व सादरीकरण (सबमिशन) मायाजालावरील विविध संकेत स्थळांवर (डिजिटल प्लॅटफॉर्मवर) करणे अत्यावश्यक झाले आहे.

भारतातील जैवविविधता संवर्धनाच्या कामासाठी या जनशक्तीचा व सामूहिक ज्ञानाचा उपयोग करण्याची वेळ आता आली आहे. ही विशिष्ट संकल्पना ध्यानात घेऊन आम्ही ‘बिग बटरफ्लाय’ महिन्याचे आयोजन करीत आहोत, जेणेकरून आम्ही ज्ञान आणि अंमलबजावणी यांच्यातील ही अंतर कमी करू शकू आणि सहभागींना फुलपाखरे, त्यांचे वर्तन, अधिवास आणि संवर्धनाबद्दल शिकू शकतील अशा व्यासपीठाद्वारा संधी देऊ उपलब्ध करून देऊ.”

‘बिग बटरफ्लाय’ महिन्यासाठी पुढील जनसंपर्क आणि शैक्षणिक कार्यक्रम नियोजित आहेत:
✔ प्रशमंजुषा
✔ छायाचित्रण आणि लघुपट (शॉर्ट व्हिडिओग्राफी) निर्मिती स्पर्धा
✔ निसर्ग लेखन
✔ वेबिनार आणि रेकॉर्डिंगद्वारे शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांपर्यंत प्रचार.
✔ भारतातील फुलपाखरू तज्ञांच्या चमूकडून सल्ला उपलब्ध करून देणे.
‘बिग बटरफ्लाय’ महिना अखिल भारतीय पातळीवर आयोजित केला जात आहे. सहभागींनी आपल्या घराजवळच्या परिसरातील फुलपाखरांच्या प्रजातीची माहिती जमवायची आहे. ह्या महिन्यात फुलपाखरां संबंधीचे शैक्षणिक साहित्य विविध समाज माध्यमांद्वारे मोफत वितरीत केले जाईल, जसे की यूट्यूब. राज्य वा प्रादेशिक पातळीवरील वैज्ञानिक सल्लागार फुलपाखरांच्या ओळख प्रक्रियेमध्ये मार्गदर्शक असतील. जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणार्‍या भारतातील २७ पेक्षा अधिक संस्था, प्रकल्प आणि फुलपाखरू अभ्यासक प्रथमच एकत्र येऊन जनसहभागाव्दारा फुलपाखरांच्या नोंदी घेण्यासाठी झटत आहेत.

सहभागी संस्थांची नावे:
Bombay Natural History Society (BNHS) – India
Diversity India
National Centre for Biological Sciences (NCBS)
Biodiversity India
Indian Foundation for Butterflies (IFB)
Doon Nature Walks
Titli Trust, Dehradun
Organization for Wildlife Studies(OWLS),Raigad

एनसीबीएसचे शास्त्रज्ञ तसेच ‘बटरफ्लाईज ऑफ इंडिया’ वेबसाइटचे मुख्य संपादक, प्रो. कृष्णमेघ कुंटे, म्हणतात “नवीन माहिती आणि मोठे माहितीसंच (डेटासेट) केवळ फुलपाखरांच्या जीवशास्त्र विषयी आपल्या वैज्ञानिक आकलनाला महत्त्व देण्यास सक्षम नाहीत तर संवर्धनाच्या दृष्टीने कृतीचे नियोजन देखील करण्यासाठी आम्हाला मदत करतील. भारताचा अतुलनीय जैवविविधतेचा वारसा कायम ठेवणे तसेच भारताच्या जैवविविधता हॉटस्पॉट्स मधील फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि बंगळुरु आणि दिल्लीच्या भागातील फुलपाखरांच्या संख्येचे निरीक्षण करण्यासाठी आतापर्यंतचे आमचे संयुक्त प्रयत्न संपूर्ण भारतभरात वाढवणे आवश्यक आहे. यासह, ‘बिग बटरफ्लाय’ महिन्यासारख्या जनसहभाग असलेल्या कार्यक्रमांमुळे निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक नागरिक तयार होईल. आशा आहे की, फुलपाखरू अधिवासांच्या संरक्षणासाठी आणि निर्मितीसाठी कार्य करेल. माझा विश्वास आहे की या उपक्रमासाठी बनविलेले विविध संस्थांचे, निसर्ग मित्रांचे मोठे जाळे हे आपल्या देशातील फुलपाखरू संवर्धंनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.”

डायव्हर्सीर्टी इंडियाचे श्री विजय बर्वे म्हणतात, “गेल्या काही वर्षांमध्ये फुलपाखरांचे निरीक्षण हा छंद म्हणून फोफावला आहे. समाज माध्यमांवरील आभासी समुदाय आणि फुलपाखरांवरील नवनव्या पुस्तकांनी त्यास उत्तेजन दिले. ‘बिग बटरफ्लाय’ महिना इंडिया २०२० मध्ये संपूर्ण देश फुलपाखरांविषयी बोलत असेल आणि पद्धतशीरपणे माहिती गोळा करणार आहे. माझ्या माहितीनुसार, प्रथमच या पातळीवर आणि अनेक संघटनांच्या सहकार्याने अखिल भारतीय स्तरावर प्रयत्न एकत्र केले जात आहेत. आयनॅचरालिस्ट सारख्या खुल्या संकेत स्थळावर संकलित केली गेलेली माहिती टाकली जाईल हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.”

OWLS मार्फत सर्व शैक्षणिक संस्था व सर्वसामान्य लोकांसाठी तज्ञांचे ऑनलाईन वेबिनार द्वारे मार्गदर्शन,चित्रकला स्पर्धा,छायाचित्रण व लघुचित्रपट स्पर्धा,प्रश्नमंजुषा असेच बरेच उपक्रम राबविण्यात येणार असून आपल्या शैक्षणिक संस्थेत हे उपक्रम आपणांस राबवायचे असतील तर आम्हाला 9011484969 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
‘बिग बटरफ्लाय’ चा भाग म्हणून येत्या सप्टेंबर महिन्यात तीन प्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक व तज्ञ श्री.आयझ्याक किहिमकर,डॉ.अमोल पटवर्धन आणि हेमंत ओगले यांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत त्यासंबंधीची अधीक माहीती OWLS च्या फेसबुक पेज वर तुम्हाला मिळू शकते तरी सर्वांनी फुलपाखरांच्या या रंगबेरंगी दुनियेची सफर करूयात असे आवाहन owls चे कुणाल साळुंखे ,OWlS रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिजित घरत यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.