Press "Enter" to skip to content

कार्यालयाच्या वेळा बदलल्या तर लोकल ट्रेन सगळ्यांसाठी सुरू होणे शक्य

कार्यालयाच्या वेळा बदलल्या तर लोकल ट्रेन सगळ्यांसाठी सुरू होणे शक्य

सिटी बेल लाईव्ह/ मुंबई

उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याची चाचपणी रेल्वे प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठीच प्रशासनाने राज्य सरकार व महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम कायम ठेवून प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करता येणे शक्‍य असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकार व महापालिका यांची तयारी हवी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लोकलला होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे शक्‍य नाही. एकाच वेळी सर्व कार्यालये सुरू होत असल्याने ही गर्दी वाढते. त्यामुळे राज्य सरकारने कार्यालयीन वेळेत काही बदल केले तर गर्दी कमी होईलच, पण एका फेरीमध्ये मर्यादित प्रवासी संख्या ठेवत ही सेवा सुरू करता येऊ शकेल.

मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून याबाबत लवकरच राज्य सरकार, महापालिका यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

जून महिन्यात ठरावीक वेळेत होत असलेली चाकरमान्यांची गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत राज्य सरकार, पालिका व रेल्वे प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत चर्चा झाली होती. काही महिन्यांनंतर सामान्यांसाठीही लोकल सुरू करायची झाल्यास ठरावीक वेळेस होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याशिवाय पर्याय नसेल. एकत्रित बैठकीत तसा निर्णय झाल्यास रेल्वे त्या दृष्टीने तयारी सुरू करेल, अशी माहितीही पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने दिली. राज्य सरकार, मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे पोलीस आयुक्त, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यात येत्या काही दिवसांत बैठक होणार आहे त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.