Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी चे परभणी कार्यालय फोडले

राष्ट्रवादीचा शिवसेनेवर आरोप

जाधवांच्या राजीनामा नाट्याला अनोखे वळण.

राष्ट्रवादीच्या परभणी येथील कार्यालयावर अज्ञात इसमांनी काल रात्री दगडफेक केल्याची घटना घडली आहे. शिवसैनिकांनीच ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने (ncp) केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीत काहीच अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद आता रस्त्यावर आला आहे. जाधव यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाली. शिवसैनिकांनीच ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिगणी पडली आहे.

परभणीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला कंटाळून शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर काल रात्री साडे दहाच्या सुमारास परभणीतील राष्ट्रवादी भवन या राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अज्ञात तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे कार्यालयाच्या काचा फुटल्या असून मोठं नुकसान झालं आहे. हल्ला झाला तेव्हा कार्यालयात कुणीच नव्हते. त्यामुळे कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. मात्र शिवसैनिकांनीच हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तीन-चार शिवसैनिकांनी कार्यालयावर दगडफेक करून संजय जाधव जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. हल्लेखोर जाधव यांचे समर्थक असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. दरम्यान, शिवसेनेने अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी नाकारलेली नाही.

दरम्यान, खासदार संजय जाधव हे परभणीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. आज सायंकाळपर्यंत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी जाधव खासदारकीचा राजीनामा मागे घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच काल उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना फोन करून त्यांची समजूत काढल्याचंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्यावेळी राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यावेळी पुढच्यावेळी आपल्याला संधी मिळेल असं सांगून आपण शिवसैनिकांना समजावलं. परंतु, आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असून त्यामुळे आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आहे, असं जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केलं होतं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.