Press "Enter" to skip to content

जेएनपीटी बंदरामुळे मोठ्या प्रमाणात तस्करी

सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔷🔶🔶🔷

गेल्या वर्षभरात नवी मुंबई हे अंमली पदार्थ व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून समोर येत आहे. जेएनपीटी बंदरामुळे मोठ्या प्रमाणात तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईत अंमली पदार्थाचा व्यापाराने जोर धरल्याचे चित्र आहे. गांजा, चरस, अफीम, एमडी, कोकेनचा साठा जप्त होण्याचे प्रमाण वाढलं आहे. स्वातंत्रदिनाच्या पाच दिवसाअगोदर तर तब्बल 1 हजार कोटीचे अफीन, हिरॉईन जप्त करण्यात आलं. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. महत्वाचे म्हणजे कोविड काळात पोलीस इतर कारवाईमध्ये गुंतले असतांना ड्रग्स माफीया सक्रीय झाले आहेत.

नवी मुंबईत शिकण्यासाठी येणारे नायजेरियन विद्यार्थी अंमली पदार्थांच्या व्यापारात सक्रीय आहेत. खारघर, तळोजा, घणसोली, पनवेल या भागात राहणार्‍या नायजेरीयन लोकांची संख्या अलिकडच्या काळात वाढली आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थाचा व्यापार करणार्‍या नायजेरीयन गँगमधील 30 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबईत ड्रग्सचा व्यापार वाढण्याची कारणं ?
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नायजेरीयन नागरिकांचे वास्तव्य, नायजेरीयन नागरिक ड्रग तस्करीत सक्रीय, जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्सची तस्करी, रस्तेमार्गे नवी मुंबईत अंमली पदार्थाचा पुरवठा, वर्षभरात गांजा, हिऱॉईन, अफूच्या तस्करीत वाढ, जेएनपीटीमुळे नवी मुंबईत ड्रग व्यापारी, तस्कर सक्रीय, एज्युकेशन हब असल्यामुळे तरुण ड्रग्सच्या जाळ्यात.

नवी मुंबईतील जेएनपीटी बंदर हे बाहेरील देशातून येणार्‍या अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे केंद्रबिंदू ठरले आहे. जेएनपीटीमधून तस्करीमार्गे येणार्‍या ड्रग्सचा साठा संपूर्ण देशात दलालाच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे नवी मुंबईत मोठे ड्रग माफीया सक्रीय झाले आहे. कधी काळी मुंबई ड्रग्सचे कार्टेल ठरलं होतं. नवी मुंबईची वाटचाल त्याच दिशेने सुरु असल्याचे पोलीस अधिकारी सांगंतात.

त्याशिवाय रस्ते मार्गाने नवी मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरुन मुंबईत दिवसाला शेकडो वाहने दाखल होतात. ट्रॅव्हल्स, पीक अप वॅन, खाजगी कारच्या माध्यमातून गांजा, ड्रग्सचा साठा आणला जात असल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मुंबईनंतर नवी मुंबई हे शैक्षणिक हब आहे. व्यापाराचे केंद्र म्हणून पुढे आले आहे. मात्र शहरातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. मात्र अलिकडे वाढत असलेली अंमली पदार्थाच्या तस्करीचे रॅकेट बघता, हा नवी मुंबईच्या तरुणाईसाठी रेड सिग्नल असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

नव्या पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी उपक्रम राबवण्याची गरज पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात लावली होती. याचा फायदा ड्रग्स माफीयांनी उचलला. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व्यापाऱाचे हब ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आता हे रॅकेट मोडून काढण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.