Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांनो काळजी सोडा : आता टिव्ही पाहून करा अभ्यास

“दूरदर्शन” वर इयत्ता पहिले ते आठवीचे शिक्षण मिळणार विनामूल्य ! ###

सह्याद्री वाहिनीवर “टिलीमिली” या दैनंदिन मालिकेद्वारे येत्या २० जुलैपासून दाखविण्यात येणार ###

सिटी बेल लाइव्ह / पुणे ###

राज्यातील जवळपास सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांना आता घरबसल्या ‘दूरदर्शन’वर इयत्ता पहिले ते आठवीचे शिक्षण विनामूल्य मिळणार आहे. मराठी माध्यमाच्या पहिल्या सत्रातील सर्व विषयांचे शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘टिलीमिली’ या दैनंदिन मालिकेद्वारे येत्या २० जुलैपासून दाखविण्यात येणार आहे.

‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर मोफत देण्याचे ठरविले आहे.या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ आणि इतर नामांकित संस्थांचा व तज्ज्ञांचा सक्रीय सहभाग आहे. या मालिकेचे नाव शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने “टिलीमिली” असे ठेवण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर राहणाऱ्या ‘टिलींना व मिलींना’ अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा रोज लाभ घेता येणार आहे.

“टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल, अशी माहिती एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी दिली आहे.

‘टिलिमिली’ मालिकेचे वैशिष्ट्य –

 • मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील.
 • मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव मिळेल
 • त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल
 • मुलांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल
 • मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल.

आठही इयत्तांचे मिळून ४८० एपिसोड्स
रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसांत ६० एपिसोड्समध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. आठही इयत्तांचे मिळून ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका येत्या २० जुलैला सुरू होईल आणि २६ सप्टेंबरला समाप्त होईल.

इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल –

 • वेळ : इयत्ता
 • सकाळी ७.३० ते ८ : आठवी
 • सकाळी ८ ते ८.३० : सातवी
 • सकाळी ८.३० ते ९.०० : ‘डिडी’चे अन्य कार्यक्रम
 • सकाळी ९ ते ९.३० : सहावी
 • सकाळी ९.३० ते १० : पाचवी
 • सकाळी १० ते १०.३० : चौथी
 • सकाळी १०.३० ते ११ : तिसरी
 • सकाळी ११.०० ते ११.३० : ‘डीडी’ चे अन्य कार्यक्रम
 • सकाळी ११.३० ते दुपारी १२ : दुसरी
 • दुपारी १२ ते १२.३० : पहिली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.