Press "Enter" to skip to content

पनवेल रेल्वे स्थानकाकडे करा प्रशस्त रस्त्यावरून प्रवेश

एन एच 4 ते रेल्वे स्टेशन रस्ता होतोय चकाचक

संघर्षमय परिस्थितीत सुद्धा झपाट्याने काम केल्यामुळे होत आहे झेनित कन्स्ट्रक्शन कंपनीचे कौतुक

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता कात टाकतो आहे. या रस्त्याचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले असून महिन्याभराच्या कालावधीत या चकाचक रस्त्यावरून रेल्वे स्टेशन कडे प्रवास करण्याचे भाग्य पनवेलकरांच्या नशिबी येत आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत सुद्धा विक्रमी वेळेत हा रस्ता बांधून पूर्ण केल्याबद्दल झेनित कन्स्ट्रक्शन कंपनी चे कौतुक होत आहे.

पनवेलच्या रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते हे नेहमीच अनेक कारणांमुळे दुर्लक्षित राहिले होते. रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाट खड्ड्यातून! अशीच भावना पनवेलकरांच्या मध्ये रुजू लागली होती.पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.

पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून सुद्धा पनवेल शहरातून रेल्वे स्टेशन कडे जाणारे रस्ते मात्र नेहमी शापीत राहिले होते. जनभावनेचा आदर करत पनवेल महानगरपालिकेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते रेल्वे स्थानक या रस्त्याला प्राधान्य देत 18 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे काम हाती घेतले. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन झेनीथ कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले.

एप्रिल 2019 ला प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्या कारणामुळे विविध थरिय भराव टाकून, सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता बनवणे खरोखरच एक आव्हान होते. या रस्त्याच्या बाजूला दाट झोपडपट्टी असल्याकारणामुळे तेथील सांडपाण्याच्या वाहिन्या, भूमिगत गटारे,विद्युत जोडण्या,टेलिफोन च्या लाइन्स,अतिक्रमणे या अडथळ्यांबाबत देखील नियोजन करणे गरजेचे होते.सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना सदर रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर केला जायचा.अर्थातच त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. नवी मुंबई परिवहन सेवेच्या पनवेल परिसरातील सर्वच मार्गांची सुरुवात रेल्वेस्थानकापासून होते त्यामुळे त्या वाहनांची देखील या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वर्दळ असते.

झेनिथ कंपनीने प्रदीर्घ अनुभव तसेच कुशल मनुष्यबळाच्या जोरावर सर्व आव्हानांवर लीलया मात करत उत्कृष्ट नियोजनाचा नमुना पेश केला आहे.
जवळपास सहाशे मीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुतर्फा बंदिस्त गटारांच काम देखील पूर्ण झाले आहे.पथदिवे,पदपथ यांची कामे जवळ जवळ पूर्ण झाली असून विभाजकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.प्रकल्प अभियंते तेजस भंडारी यांनी साधारण महिन्याभरात या रस्त्याचे काम संपूर्ण होईल असे सांगितले.तसेच इतकी आव्हाने असताना सुद्धा अवघ्या सव्वा वर्षात काम अंतिम टप्प्यात आल्याबद्दल त्यांच्या टीम मधील समन्वय कामी आला असे सांगितले.

दरम्यान महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण ,परिवहन विभाग यांनी चोख कामगिरी बजावत उत्तम समन्वय दर्शविल्याने हे काम विक्रमी वेळेत होत आहे. स्टेशन कडे जाणारा रस्ता चकाचक होत असल्याने पनवेलकर समाधान व्यक्त करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.