Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्या : अॅड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद #

येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील 60 वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान 5 हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंदिर, मशीद, चर्च बांधण्यात स्वारस्य नसून कर्जबाजारीपणामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी तसेच बेरोजगारांना रोजगार देणे तसेच राज्यातील कोरोना महामारीचे संकट आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे .एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्याने मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्ष जमिनीमध्ये गाळलेला घाम, केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीच्या 10 पटीने नाही तर 100 पटीने जास्त आहे. सार्वजनिक क्षेत्रातील शिपायाचा पगारही 20 हजाराहून जास्त आहे. शिक्षक, कर्मचारी ,अधिकारी यांचे पगार 50 हजार, एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर बेभरवशाची शेती करून या सर्व जनतेला आणि देशाला खाऊ घातले व जगवले त्यांना पेन्शन तर सोडाच श्रमाचे योग्य किंमतही आजपर्यंत कोणी दिले नाही. नापिकी व उत्पादनाच्या बेभरवशामुळे कर्जाच्या ओझ्याने दबलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे. 7/ 12 धारक पुरुष व महिला, भूमिहीन शेतकरी ,भूमिहीन शेतमजूर, खंडकरी म्हणून वहिवाटीने करणारे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यमारी करणारे जंगल/ वन जमिनीवर जगणारे सर्व आदिवासी /वनवासी हे सर्वजण शेतकरी म्हणून पेन्शन मागण्यास व मिळण्यास पात्र व हक्कदार आहेत असे स्पष्ट मतहीअॅड भोसले यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांची अवस्था जाणून आज देशातील अनेक राज्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे .काही ठळक योजना पुढील प्रमाणे: केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब ,आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे .आयुष्यभर काबाडकष्ट करून देशातील नागरिकांना जगवीनाऱ्या बळीराजाला पेन्शन देण्यास आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने चालढकल केली आहे. देशातील शेतकरी सोडून इतर कोणताही घटक आत्महत्येकडे वळलेला नाही. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा दुष्परिणाम म्हणूनच गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना प्रति महिना 5 हजार पेन्शन देऊन आपण व्यापाऱ्यांचे हित जोपासणेऐवजी शेतकऱ्यांच्या हितालाही प्राधान्य देत असल्याचे दाखवून द्यावे असे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.