Press "Enter" to skip to content

खासदार सुनील तटकरे आपला वाढदिवस साजरा करणार नाही


कोरोना आणि चक्रीवादळाच्या संकटामुळे खा. तटकरेंचा निर्णय ###

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) ###

रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि.10) आहे. मात्र कोरोना आणि कोकणावर आलेले निसर्गचक्रीवादळाचे संकट यामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय खासदार सुनील तटकरे यांनी घेतला आहे. दरवर्षी सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम असतात, शिवाय अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्यभरातील देशभरातील विविध क्षेत्रातील तसेच सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहतात.
तटकरे यांनी सांगितले की विकासकाम करत असताना लोकांचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर यामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते. दरवर्षी माझ्या वाढदिवशी याच भावनेतून आपण मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता व मी देखील त्या स्वीकारण्यासाठी उत्सुक असतो.
मात्र गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या भेटीत दुर्दैवाने यंदा खंड पडणार आहे, याबद्दल खंत वाटते. करोनाच्या संकटाला आपण धीराने सामोरे जात असतांनाच निसर्ग चक्रीवादळाचे अस्मानी संकट कोसळले. कोकणातले शेतकरी, कष्टकरी, बागायतदार, चाकरमानी, मच्छिमार, व्यापारी सर्वांचेच मोठे नुकसान झाले. या कठीण परिस्थितीला आपण सर्व धैर्याने तोंड देत आहोत. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आपली सर्वांची लढाई आहे, यात मी सहकुटुंब आपल्या पाठीशी उभा आहे.
या संकटकाळात 10 जुलै रोजी येत असलेल्या माझ्या वाढदिवशी मी प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करू शकणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. आजवरच्या माझ्या सामाजिक-राजकीय वाटचालीत आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहिले व पुढेही राहतील, हा विश्वास आहे. आपण आहात तिथूनच माझे शुभचिंतन करा, आपल्या शुभेच्छा, प्रेम व आशीर्वाद माझ्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपण आपल्या व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपली सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.