Press "Enter" to skip to content

रामपूरच्या जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम

” घरातूनच शाळा व सुपर संडे “

सिटी बेल लाइव्ह / Exclusive

कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्या कालावधीत सुचलेल्या घरातूनच शाळा आणि सुपर संडे ह्या अभिनव उपक्रमाला आज शंभर दिवस पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने या उपक्रमाचा घेतलेला आढावा.

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर ध. येथील शाळेत लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश देत एक अनोखा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बावीस मार्चपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तशी रामपूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ही सुट्टी देण्यात आली होती. ही शाळा इयता पहिली ते चौथी अशी चार वर्गाची असून एकूण 27 विद्यार्थी शाळेत शिकतात.

आपले विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत हे लक्षात घेऊन रामपूर शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ वरगंटवार व सहशिक्षक नंदकुमार राजमल्ले यांनी मुले अभ्यासापासून दूर जाणार नाहीत याची काळजी घेत ” घरातूनच शाळा व सुपर संडे ” हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एक व्हॉटसअप ग्रुप तयार केले. यातुन शाळेतील एकूण 27 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थ्यांच्या पालकांचा यात समावेश झाला व इतर 5 विद्यार्थ्यांची जबाबदारी गावातील वरिष्ठ मंडळीं विशेष करून उपसरपंच श्री व्यंकटराव पवार यांनी स्विकारली. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्यांना आपल्या मोबाईलवरून अभ्यास ते रोज देण्यास मदत करत होते. विशेष म्हणजे या शाळेतील सर्व विद्यार्थी प्रगत असून वाचन, लेखन आणि गणिती क्रिया करण्यात पारंगत आहेत. मागील वर्षी या शाळेने सुट्ट्याच्या कालावधीत राबविलेला ‘ अशी सुट्टी घालवू या ‘ या उपक्रमाला नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून या ग्रुपवर शाळेतील शिक्षक नंदकुमार राजमल्ले हे दररोजचा अभ्यास सकाळी सहा वाजता पोस्ट करत होते. पालक आपापल्या पाल्याना मोबाईल मधील अभ्यास दाखवून प्रश्न लिहून घेण्यास सांगत, सर्व मुले प्रश्न घेऊन अभ्यास करत असे. प्रश्नाला अनुसरून लेखन करणे व पालक विद्यार्थ्यांच्या लेखनाचे फोटो ग्रुपवर पाठविणे आणि लगेच शिक्षकाकडून तपासणी करून मार्गदर्शनपर टिप्पणी करण्याचे काम करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन मोबाईल नाही त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यादवराव पवार आणि गावातील वरीष्ठ मंडळी विश्वनाथ पवार, नारायण पवार, साईनाथ रेवणे, श्रीनिवास सज्जन, गौस शेख, लतीफ खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

दर रविवारी आज अभ्यास नाही मज्जाच मज्जा या नावाखाली विविध कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षणाचे कार्य दिल्या जात होते. दप्तरमुक्त शाळा या उपक्रमाप्रमाणे सुपर संडे या उपक्रमात रविवारी विद्यार्थी खूपच आनंदाने सहभागी झाले होते. शंभर दिवसाच्या या कालावधीत सुपर संडे उपक्रमात एकूण 14 रविवार आले होते ज्यात पहिल्या रविवारी चित्र व रांगोळी काढणे, कागदी व मातीच्या वस्तू बनविण्याचे काम देण्यात आले. दुसऱ्या रविवारी खेळभांडे, मांडव टाकणे, बियांपासून डिझाईन करणे. तिसऱ्या रविवारी चिमणी उडाली कावळा उडाला, चल्लस, व राजा राणी पोलिस चोर खेळ. चौथ्या रविवारी काचपूरणी, सागरगोट्या व जिबल्या खेळ खेळण्यासाठी सांगण्यात आले. पाचव्या रविवारी कागदी जहाज बनवणे, विमान बनवणे, भिंगरी बनवणे, गोट्या खेळणे. सहाव्या रविवारी पाण्याचे फुगे, धनुष्यबाण बनवून खेळणे. सातव्या रविवारी योगायोगाने जागतिक योग दिवस आल्याने त्यादिवशी जागतिक योगा दिन साजरा करणे, हा विषय देण्यात आला होता. ज्याला की उत्तम प्रतिसाद मिळाला. यात विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील सहभाग नोंदविला होता. आठव्या रविवारी टायर फिरवणे, दोरीवरील उड्या व कांदाफोडी हे खेळ घेण्यात आले. नवव्या रविवारी मातीची भिंगरी तयार करणे व पुस्तकांना पुठ्ठा म्हणजे कव्हर लावणे. दहाव्या रविवारी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे व दुरूनच नमस्कार करणे ही क्रिया मुलांकडून करवून घेऊन जनजागृती करण्यात आली. अकराव्या रविवारी या कोरोना महामारीच्या काळात जे काही डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पोलीस, सैनिक आणि इतर कर्मचारी मृत्यू पावले त्यांना मानवंदना देण्यासाठी उजव्या हाताच्या मनगटावर पांढरा रुमाल बांधण्याचा उपक्रम घेण्यात आला. कारगिलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैन्यास कारगिल विजय दिनानिमित्त जय हिंद लिहून मानवंदना देण्याचा उपक्रम घेण्यात आला. तेराव्या रविवारी मुलांवर श्रमाचे संस्कार व्हावे म्हणून आई-बाबांना घरकामात मदत करणे हा उपक्रम घेण्यात आला आणि शेवटच्या चौदाव्या रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने भारतीय ध्वजाचे चित्र काढणे, रांगोळीतून भारतीय ध्वज काढणे किंवा पानांचा, फुलांचा अशा विविध वस्तूंचा वापर करून ध्वज काढण्याचा उपक्रम घेण्यात आला. या सर्व सुपर संडेच्या उपक्रमात शाळेतील आणि शाळेबाहेरील असे 146 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभाग नोंदविला आहे. सुपर संडे हे वैशिष्ट्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक होते म्हणून मुले प्रत्येक रविवारची आतुरतेने वाट पाहत होते.
चार मे रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले आहे.

रोज सकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर पोस्ट टाकल्या जात असे. ग्रामीण भागातील पालक शेतीकाम किंवा अन्य कामासाठी बाहेर जातात मग मुलांना मोबाईल पाहायला व आजचा अभ्यास बघायला मिळत नाही म्हणून लवकर पोस्ट टाकल्या जात असे आणि विद्यार्थी आजचा अभ्यास वहीत लिहून घेऊन पालकांना मोबाईल परत करत असे आणि दिवसभर दिलेला अभ्यास करतात. 

नंदकुमार राजमल्ले, उपक्रमाचे संयोजक उपक्रमशील शिक्षक
या उपक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री एल. एन. गोडबोले साहेब व केंदप्रमुख श्री एस. डी. आंदेलवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गावातील पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि माझे सहकारी शिक्षक नंदकुमार राजमल्ले यांच्या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे हा उपक्रम शंभर दिवस चालविण्यात यशस्वी झालो आहोत.  

नागेश वरगंटवार,
शाळेचे मुख्याध्यापक

या अभिनव उपक्रमासाठी उदय शिल्लारे, क्रांती बुद्धेवार, किरण रणवीरकर, साईनाथ सायबलू, रमेश इटलोड, साईनाथ पाटील यांचे ही मोलाचे असे सहकार्य लाभले आहे.

शब्दांकन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.