Press "Enter" to skip to content

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नर्सेस झाल्या खऱ्या सिस्टर

नर्सेस नी कोरोनाग्रस्त रुग्णांना बांधल्या राख्या

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले /नवी मुंबई -ठाणे #

काल रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असला तरीही यावर्षी कोरोनामुळे अनेक नागरिकांना रक्षाबंधन सणाचा आनंद घेता आला नाही. अनेक भाऊ हे कोरोनावर उपचार घेत असल्यामुळे त्यांच्या बहिणींना त्यांना राखी बांधता आली नाही. भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत.व या नात्याला सामाजिकतेची जोड मिळावी म्हणूनच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफने हा सण साजरा करण्याचे ठरविले, यासाठी दोन दिवसांपूर्वी साध्या रेशीमच्या राख्या मागविल्या होत्या व त्या सॅनिटाईज करून ठेवल्या होत्या.

काल तेरणा हॉस्पिटलच्या नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफने ४० कोरोनाग्रस्त नागरिकांना राख्या बांधल्या. कोरोनाग्रस्त भाऊ व बहीण जर एकाच हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना कोरोना संकटातही रक्षाबंधन साजरा करण्याची संधी नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथील नर्सिंग व पॅरा मेडिकल स्टाफने उपलब्ध करून दिली.

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सौम्य लक्षणे आढळलेले अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण भरती झाले असून एकाच घरातील अनेक सदस्य कोरोनावर उपचार घेत आहेत.यावेळी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट परिधान केले होते व इतर वैद्यकीय सुरक्षेचे पालन केले होते . नर्सेसना सिस्टर अशीच हाक मारतो परंतु कोरोना संकटाने या सिस्टर्सना रक्षाबंधन करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली अशी भावना तुर्भे येथे राहणाऱ्या व सध्या कोरोनाचे उपचार घेत असलेल्या नागरिकाने व्यक्त केली. आज त्यांनी आम्हाला राखी बांधली असली तरी आमची रक्षा या सिस्टर करीत आहेत प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी त्या अहोरात्र पहारा देत आहेत व या उपकाराची जाण आम्ही आयुष्यभर ठेवू असे भावुक उदगार तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केले.

कोरोना झाल्यावर अनेक नागरिक निराशेच्या गर्तेत जातात परंतु कोरोनाग्रस्त नागरिकांवर फक्त वैद्यकीय उपचार न करता या रुग्णांमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण करण्यासाठी हे रक्षाबंधन नक्कीच उपयोगी ठरेल अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.