Press "Enter" to skip to content

महावितरण कार्यालयावर भाजपाची धडक : टाळेबंदी आंदोलन

अन्यथा.. महावितरण अधिकार्‍यांना घरातून बाहेर पडू देणार नाही !

मुजोर महावितरण अधिकार्‍यांची मस्ती उतरवणार !

आमदार प्रशांत ठाकूर यांचा महावितरण विरोधात एल्गार

 सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी)

येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावीजवितरण कंपनीला व राज्य सरकारला आज (दि. ०४ ऑगस्ट )दिला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांवर अन्याय करण्याचे काम करीत आहे, त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील, अशा शब्दात त्यांनी संतापही व्यक्त केला.           कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्यामुळे व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने वीजग्राहक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेली विजेची जाचक बिले पुन्हा पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत तसेच वीज दरवाढ रद्द करावी, यासाठी राज्य शासन व विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर आज  टाळेबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.      

पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले कि, कोरोना संक्रमण पाहता केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी ७० हजार कोटी रुपयांचे तर उद्योगधंद्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे भरघोस पॅकेज दिले मात्र महाराष्ट्र सरकार डोळे मिटून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. रेशन वाटपातही राज्य सरकारने पिवळे आणि केशरी रेशनकार्ड करत ढिसाळपणा केला. कोरोनाच्या काळात या रोगाला सामोरे जाताना नागरिकांचे मोठे हाल होत आहे, उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मात्र तरीही हे सरकार निद्रास्त अवस्थेत राहिला आहे. लोकांना दिलासा देण्याऐवजी हे तीन पक्षाचे सरकार सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करीत आहे. असा घणाघात करत महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला.    
वाढीव बिलांची दुरुस्ती करून देयके देण्याचे आश्वासने देण्यात आली मात्र प्रत्यक्षात तसे न करता गुपचूपपणे वीज दर वाढ करून सर्वसामान्य नागरिकाला नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रताप महाविकास आघाडी सरकार आणि महावितरणने केला आहे, असे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. 
या आंदोलनाचा धसका घेऊन महावितरणने स्वतःहून टाळे लावल्याचे सांगून वीज ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडते त्यामुळे या सेवेचा आणि नागरिकांचा विचार करता संवेदनशीलपण राखत प्रतिकात्मक टाळेबंद करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे, मात्र प्रश्न निकाली न निघाल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीतून उठून देणार नाही, असा सज्जड दमही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला. 

यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुशील शर्मा यांनीही आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांचा सहभाग होता. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.