Press "Enter" to skip to content

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंवरील आघातांवर विचारमंथन !


‘सेक्युलर’ भारतातील ‘हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था,हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च ! : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

सिटी बेल लाइव्ह / रायगड #

‘झोमॅटो’च्या मुसलमान डिलीव्हरी बॉयकडून पार्सल स्वीकारण्यास विरोध करणार्‍या हिंदु ग्राहकावर ‘भोजनाला धर्म नसतो’, असे सांगत कायदेशीर कारवाईची मागणी सेक्युलवाद्यांनी केली; मात्र आज भारतात मांसाहारच नव्हे, तर अनेक शाकाहारी पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंकुल, डेटींग साईट आदींसाठी इस्लामी कायद्यानुसार ‘हलाल सर्टिफिकेट’ची व्यवस्था लागू आहे. यातून इस्लामी संस्थांना हजारो कोटी रुपये मिळतात. खरेतर ‘सेक्युलर’ भारतामध्ये इस्लामी अर्थकारणाला चालना मिळणारी ‘हलाल सर्टिफिकेट’ ची व्यवस्था हा 80 टक्के हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च आहे आणि तो रहित करण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे यांनी केले. ते ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी ‘हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमांतून भारतात आर्थिक जिहाद’ या विषयावर बोलत होते.

हे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत सायंकाळी 6.30 ते 8.30  या वेळेत ‘ऑनलाईन’ होत आहे.  समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि फेसबूकद्वारे हे अधिवेशन  68 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 3 लाख 45 हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.

या अधिवेशनात तामिळनाडू येथील हिंदु मक्कल कत्छीचे संस्थापक अध्यक्ष  अर्जुन संपथ म्हणाले की, ‘कोरोना वाहका’ ची भूमिका निभावणार्‍या तबलीगी जमातच्या देहलीतील कार्यक्रमाला तामिळनाडू मधून 2,500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. ते राज्यात परतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना पुष्कळ वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या. बरे झाल्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना कुराणवाटप केले. याउलट या काळात हिंदूंना वैद्यकीय सुविधा देतांना भेदभाव केला जात आहे.’

तामिळनाडू येथील शिवसेनेचे राज्यप्रमुख जी. राधाकृष्णन् या वेळी म्हणाले की, ‘पेरियार, तसेच द्रमुक यांचे कार्यकर्ते यांनी भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म, परंपरा, संस्कृती,  स्तोत्र, तसेच ब्राह्मण समाज यांना अपमानित करून हिंदुद्वेष जोपासला. पेरियार यांचा पुतळा रंगवणार्‍या हिंदु कार्यकर्त्यावर कारवाई होते; मात्र या हिंदु विरोधकांवर होत नाही. जेथे धर्मावर आघात होतील, तेथे आम्ही रस्त्यावर उतरू, कायदेशीर लढाईही लढू.’

पाकिस्तानातील 2 सहस्रांहून अधिक हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवून देणार्‍या ‘निमित्तेकम’ संस्थेचे अध्यक्ष  जय अहुजा या वेळी म्हणाले की, आज पाकिस्तानात शिल्लक राहिलेल्या 70 लाख हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचे काम ‘रियासत-ए-मदिना’ अर्थात् ‘काफिरमुक्त भूमी’ या संकल्पनेखाली तेथील इम्रान खान सरकार करत आहे. प्रतिदिन हिंदु मुलींचे बलपूर्वक अपहरण, निकाह, नंतर वेश्या व्यवसायात ढकलत त्यांचे शोषण केले जाते. कोरोना महामारीच्या काळात हातावर पोट असलेल्या 1,600 हिंदूंचे अन्नाचे पाकिट देण्याच्या बदल्यात धर्मांतर करण्यात आले. 

पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्य करणार्‍या सौ. मीनाक्षी शरण म्हणाल्या की, ‘पाकमधील पीडित हिंदू भारतात आश्रय घेतात; त्यांनी अत्याचार सहन केले, पण धर्म बदलला नाही. ते खरे प्रामाणिक हिंदू आहेत, पण भारतात मुख्य प्रवाहात अद्याप ते सामावलेले नाहीत. त्यांचा कल आणि कौशल्य पाहून त्यांना काम मिळवून द्यायला हवे. 

‘प्रज्ञता’ संस्थेचे सहसंस्थापक आशिष धर म्हणाले की, आम्ही राष्ट्र-धर्म यांवरील आघातांविषयीची माहिती पोचवण्याच्या हेतूने व्हिडिओ बनवून ते प्रसारित करतो. विस्थापित काश्मिरी पंडित, राम मंदिर निर्माण, बांगलादेशी हिंदूंची व्यथा आदी अनेक विषयांवरील व्हिडिओजमुळे मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.