Press "Enter" to skip to content

11 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर निषेध आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित आणि बौद्धांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकार च्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉक डाऊन च्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.बौद्ध आणि  दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी  तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या दि.11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय; तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

हे निषेध  आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून  करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

राज्यात दलितांवरील वाढत्या  अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध  आंदोलन करण्यासाठी दि. 11 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे.
दि.11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट  गोळीबार  करण्यात आला. त्यात 11 जण शाहिद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ  आंदोलन करते. त्यामुळे दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.