Press "Enter" to skip to content

पाण्यासाठी आदिवासींचा मोर्चा

शुद्ध व नियमित पाण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाचा मोर्चा, पाणी पुरवठा कार्यालयाला लाडीवली – आकुलवाडी ग्रामस्थ ठोकणार टाळे

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी परिसरातील गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीन गावे व चार आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा न करणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर राष्ट्र सेवा दल संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी वारंवार पत्रव्यवहार मोर्चे आंदोलने करून देखील पाणी प्रश्न न सोडविणा-या अकार्यक्षम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे संतप्त ग्रामस्थ व संघटना प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात कळविले आहे.

पाताळगंगा एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना मागील १० ते १२ वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२ वर्ष जुन्या व नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेवीणा पुरवठा केला जातो.तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास याबाबत संबंधित गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच, रा.जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उप अभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पं.स.च्या गटविकास अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही होत नाही म्हणून लाडीवली गावांतील महिलांसह आदिवासी बांधवांनी १५ मार्च २०२१ रोजी पनवेल पंचायत समिती पनवेल येथे मोर्चा काढूनही परिस्थिती जैसे थे राहील्याने रायगडच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याकडेही पत्रव्यवहार केला. तरीही कोणताच मार्ग निघाला नाही.

म्हणून या समस्येवर पर्याय म्हणून शेजारीच असलेल्या पाताळगंगा एम.आय.डी. सी. (MIDC) च्या कडून पाणी घेऊन नवीन योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दल रायगड या संघटनेच्यावतीने मंगळवारी १३ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ‘शिवतीर्थ’ या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने रा. जि. परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता येझरे, उप अभियंता सुनील मेटकरी व इंगळे हे दि.१० जुलै २०२१ रोजी लाडीवली गावांत येऊन संघटना प्रतिनिधी व ग्रामस्थ प्रतिनधींच्या मागण्या मान्य करीत यापुढे शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच संबंधित सर्व गावे व आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचे वेळापत्रकही लावण्यात येईल व महत्वाचे म्हणजे पाताळगंगा एम.आय.डी. सी. कडून पाणी घेऊन एक कोटी छप्पन्न लाखांची जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची जिल्हास्तरीय व प्रादेशिक स्तरावरील प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील ४ महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी आश्वासन राष्ट्र सेवा दल रायगडचे जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना देत दि १३ जुलै २०२१ रोजीचे रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार निष्क्रिय व्यवस्थेला अजून एक संधी दयावी म्हणून सदर मोर्चा काही दिवसांसाठी तात्पुरता स्थगीत करीत यापुढे पाणी प्रश्न न सुटल्यास कोणतीही सूचना न देता संबंधित रा.जि.परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहील असे लेखी कळवूनही आज पर्यंत सदर गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी निघाला नसल्याने शुद्ध व नियमित पाणी पुरवठा न करणाऱ्या गुळसुंदे ग्रामीण पाणी पुरवठा समिती, गुळसुंदे ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रा.जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता व कर्मचारी यांची चौकशी, करून संबंधितांवर कारवाई करावी व जल जीवन मिशनमधून प्रस्तावित योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी
येत्या सोमवारी दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर राष्ट्र सेवा डाळ संघटनेच्या वतीने मोर्चा काढून संबंधित अकार्यक्षम जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राष्ट्र सेवा दलाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढोरे, लाडीवली ग्रामस्थ प्रतिनिधी सुरेखा वाघे, विजया मांडवकर, आकुलवाडी ग्रामस्थ प्रतिनिधी पल्लवी ठाकूर,अरुणा चव्हाण अश्विनी मालुसरे, राजश्री म्हामणकर दर्शना म्हामणकर आणि रेखा कालेकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.