Press "Enter" to skip to content

रस्त्यासाठी मनसे रस्त्यावर

पोलादपूर शहरातील अंडरपास रस्त्यासंदर्भात मनसे आक्रमक !

स्वाक्षरी मोहिमेनंतर मनसे थेट आंदोलनाच्याही पवित्र्यामध्ये

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पोलादपूर शहरामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अंडरपास रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे त्रस्त नागरिक आणि विद्यार्थी वर्गाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी केलेल्या स्वाक्षरी आंदोलनानंतर आता लवकरच जनतेसोबत आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय मनसे शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला.

पोलादपूर शहरामधून अंडरपास जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर मंजूर आराखडयात केवळ एक ब्रिज मंजूर असताना त्यापेक्षा जास्त चार ब्रिज अनावश्यक ठिकाणी बांधून मोठया प्रमाणात काही व्यक्तींसाठी सरकारी पैशाची उधळण सुरू आहे. पोलादपूर शहराचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सद्यस्थितीतील अस्तित्व या अंडरपास महामार्गामुळे आता सर्व्हिस रोडवर आले आहे. प्रभातनगर पूर्व व पश्चिम या लोकवस्त्यांसह रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल, गोकुळनगर, जाखमातानगर, आनंदनगर भैरवनाथनगर, तांबडभुवन आणि काटेतळी रोड या भागातील नागरिकांना मोठा वळसा घालून जाण्याची वेळ भविष्यात ओढवणार आहे किंवा या लोकवस्त्यांसाठी पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील भागात छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयामागील एका पुलासोबतच एस.टी.स्थानकाच्या उत्तरेकडील वाहन आत शिरण्याच्या मार्गासमोरपर्यंतच्या साधारणपणे तीनशे ते चारशे मीटरपर्यंत आणखी चार ब्रिज बांधण्यात येत आहेत. यापैकी एक ब्रिज पूर्ण झालेला दिसून येत आहे.

भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली

महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या रूंदी आणि लांबीसह गटारे आणि फूटपाथ याबाबत मोठया प्रमाणात साशंकता निर्माण होणारी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे बाधितांच्या समितीचे स्वार्थापुरते रूपांतर करून मोबदला घेऊनही ताबा न देणाऱ्यांना आता नव्याने आंदोलन करणाऱ्या ठेकेदारधार्जिण्या समाजसेवकांचे आव्हान उभे राहिले असून या समाजसेवकांनी उपठेकेदारीसाठी महत्वपूर्ण भूमिका साध्य केली आहे. या सर्व प्रश्नी पोलादपूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रशासनाची तयारी नसून ज्यांनी मोबदला घेऊनही जमिनीवरील इमारतींचा ताबा सोडला नाही अशा नेतृत्व करणाऱ्यांचे ऐकणे प्रशासनाप्रमाणेच ठेकेदारांनाही भाग पडले आहे. यामुळेच जनतेच्या गरजांकडे दूर्लक्ष करून सध्या महामार्गाचे पोलादपूर शहरातील काम केवळ बाधितांच्या समितीचा स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्यांच्या मर्जीने सुरू असल्याची नाराजी अजूनही पोलादपूरकर नागरिक उघडपणे व्यक्त करताना दिसून येत नाहीत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना ओलांडता यावा म्हणून पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान कमानी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 सुरक्षितपणे भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एक हजाराहुन जास्त विद्यार्थी अन् नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी मनविसे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष प्रविण पांडे, तालुका उपाध्यक्ष पंकज कोळसकर, ओंकार जाधव, शहर उपाध्यक्ष सुमित जिमन, आदेश गायकवाड, शहर सचिव निखिल वनारसे, प्रसिध्दी माध्यम प्रमुख गौरव निकवाडे, अखिलेश शिंदे, सागर जगताप, संकेत जगताप, सुरज जगताप, अक्षय शिवदे, आदित्य गायकवाड, संकेत सुतार आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या स्वाक्षरी मोहिमेद्वारे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या आस्थापनेला देण्यात आलेल्या निवेदनाचा परिणाम न झाल्यास लवकरच सर्वच समाजधुरिणांच्या पाठिंब्यावर बिगरराजकीय प्रकारचे व्यापक आंदोलन छेडण्याचा मनोदय दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.