Press "Enter" to skip to content

महेंद्र घरतांचा हल्लाबोल

आम्हाला कोणीही गृहीत धरू नये : जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत महेंद्र घरत यांचा पुनरुच्चार

आमचे लचके तोडणाऱ्यांना सोडणार नाही : महेंद्र घरत कडाडले

सिटी बेल | शेलघर |

रायगड जिल्ह्यात आमची लढाई अन्य कुणाशी नसून आमची आमच्याशीच लढाई आहे.अहंकार सोडला, हेवेदावे सोडले तर रायगड जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस नंबर 1 पोझिशन वरती असेल.अशी आक्रमक मते मांडत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत चौफेर फटकेबाजी केली.शेलघर च्या जोमा नारायण घरत सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व तालुका अध्यक्ष व विविध सेलच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार देण्यासाठी विभाग निहाय बैठका घेणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले.

या बैठकीला माजी अध्यक्ष जे टी पाटील,माजी सरचिटणीस डॉ भक्तिकुमार दवे, आणि भाजपा ला राम राम करून स्वगृही परतलेल्या जी आर पाटील या जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.संघर्षमय कालखंडात देखील पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत घेऊन जाणाऱ्या तमाम तालुका अध्यक्ष यांचा यावेळी महेंद्र घरत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी क दर्जा नगरपरिषद असून देखील तब्बल अकरा कोटी रुपये निधी खर्च करून अद्ययावत नूतन कार्यालय उभारल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोठमोठ्या महापालिकांच्या कार्यालयांना लाजवेल अशी इमारत उभारली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या कोकण समितीच्या समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

महेंद्र घरत आपल्या भाषणात म्हणाले की रायगड जिल्ह्यात काँग्रेस कोठे आहे? असे विचारणाऱ्यांना आम्ही शानदार पदग्रहण सोहळ्यातून चोख उत्तर दिले आहे.कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांच्या कबरीवर नतमस्तक होऊन मी काम करण्यास सुरुवात केली.गेल्या सव्वा दोन महिन्यात मी रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.आज भाजपच्या भूलथापांना जनता वैतागली आहे.विकासाच्या नावाखाली लोकांना लुटले जात आहे.खरा विकास हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच होत होता हे जनता आता जाणून आहे.आज फक्त अंबानी आदानी यांची प्रॉपर्टी वाढत आहे आणि भाजपची प्रॉपर्टी वृद्धिंगत होत आहे.त्रस्त झालेल्या जनतेला कॉंग्रेस पक्षाकडून अपेक्षा आहेत आणि त्या पुर्ण करण्यासाठी आपल्याला ग्राउंड लेव्हल वरती काम करावे लागेल.

घरत पुढे म्हणाले की वेल बिगन् इज हाफ डन!आपली सुद्धा चांगली सुरुवात झाली आहे.परंतु आपल्याला लढावे लागेल. विजिगीषू वृत्ती असणाऱ्या स्व्.मधुकर ठाकूर आणि स्व्.माणिकराव जगताप यांच्या प्रमाणे आपल्याला झटून काम करावे लागेल.विश्वासघाताचा फटका बसला नसता तर या दोन दिग्गज नेत्यांनी रायगड मध्ये काँग्रेसचा तिरंगा कायम फडकत ठेवला असता.रायगड जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी हेवेदावे आणि अहंकार दूर ठेवून आपल्याला एक दिलाने पुन्हा काम करावे लागणार आहे.एक कार्यकर्ता म्हणून जनमानसात प्रसिद्ध होण्यासाठी लोकांची कामे करावी लागतात, विजिटिंग कार्ड छापून तो दर्जा प्राप्त होत नाही.आमचे लचके तोडणाऱ्यांना सोडणार नाही,आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही,आम्हाला कोणी गृहीत धरू नये.

आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना महेंद्र घरत म्हणाले की, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.जिल्ह्यामध्ये आघाडी प्रस्थापित करण्याबाबतचा निर्णय सगळ्यांची मते विचारात घेऊन मगच घेतला जाईल.परंतु कुणीही कुठेही परस्पर आघाडी करायचा प्रयत्न देखील करू नका.सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आम्ही गटनिहाय आणि गण निहाय बैठका घेणार आहोत.

महेंद्र घरत अध्यक्षस्थानी असणाऱ्या या बैठकीमध्ये माजी अध्यक्ष जे टी पाटील,माजी सरचिटणीस डॉ भक्तिकुमार दवे,जी आर पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील,नंदा म्हात्रे,चिटणीस ऍड प्रवीण ठाकूर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सदस्य तसेच रायगड जिल्हा महिला सेल अध्यक्ष ऍड श्रद्धा ठाकूर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मोईस शेख,विधी व न्याय सेल चे रायगड जिल्हा अध्यक्ष ऍड के एस पाटील,महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप,नाना जगताप,सुजय जगताप, सेवादल महाराष्ट्र प्रदेश सचिव मोनिका पाटील,सोशल मिडीया सेल कोकण समन्वयक अभिजित पाटील,युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी,गणेश म्हात्रे, मिलिंद पाडगावकर,प्रदेश प्रतिनिधी इस्माईल घोले,पनवेल तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, उरण तालुका अध्यक्ष जे डी जोशी,कर्जत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे,खालापूर तालुका अध्यक्ष रमेश म्हात्रे,तळा तालुका अध्यक्ष खेडु वाजे, माण गाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष विजय तोडणकर,म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ मोईस शेख,महाड तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे खोपोली शहर अध्यक्ष रिचार्ड जॉन,रोहा शहर अध्यक्ष मितेश कल्याणी,नागोठणे शहर अध्यक्ष अशफाक पानसरे आदी मान्यवरांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.