Press "Enter" to skip to content

रायगडात घरफोड्या करणारे पुण्यातील अट्टल चोरटे जेरबंद !

रायगडात घरफोड्या करणारे पुण्यातील अट्टल चोरटे जेरबंद !

खोपोली, रसायनी, नेरळ परिसरातील 9 गुन्हे उघडकीस : 11 लाख 8 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सिटी बेल | अमूलकुमार जैन |अलीबाग |

रायगड जिल्ह्यातील खोपोली, रसायनी, नेरळ परिसरात घरफोड्या, चोर्‍या करुन धुमाकूळ घालणार्‍या पुणे-रामटेकडी येथील दोन चोरट्यांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आले असून, 11 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या घरफोड्यांमधील अन्य दोन अट्टल चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून, ते पोलीस कोठडीत आहेत.

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गेल्या महिन्यात 16 सप्टेंबर रोजी घरफोडी, चोरी झाली होती. घरफोडी, चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने, हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आदेश केले होते. पोलीस अधीक्षक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने घरफोडी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचा मागोवा घेत गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेण्यात आला. गुप्त बातमीदार व वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे संशयित निष्पन्न केले. त्यानंतर मोटारसायकल मालक इरफान रसुल शेख याला ताब्यात घेण्यात आले.

चोरांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल

त्याच्याकडे मोटारसायकलबाबत विचारणा केली असता सदरची मोटारसायकल ही ऐलानसिंग शामसिंग कल्याणी व रवीसिंग शामसिंग कल्याणी यांना दिल्याची कबुली त्याने दिली. त्यावरुन ऐलानसिंगला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा भाऊ रखीसिंग शामसिंग कल्याणी व मित्र लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी यांनी रायगड येथे घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी दिले असल्याचीही कबुली दिली.

पोलिसांनी या प्रकरणात इरफान रसुल शेख याच्याकडून चोरीसाठी वापरलेली 35 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची अ‍ॅक्टीवा मोटारसायकल जप्त करत, ऐलानसिंग शामसिंग कल्याणी याच्याकडून खोपोली पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यातील 10 लाख 73 हजार 350 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.आतापर्यंत त्यांच्याकडून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील 3, रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील 2, नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील 5 असे गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोड्यांमध्ये 11 लाख 23 हजार 100 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. यापैकी 11 लाख 8 हजार 350 रुपये किमतीचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.