Press "Enter" to skip to content

उरण पालीका अडचणीत

खारफुटीवर कचरा टाकणे पडले महागात : उरण नगरपालिकेला डंपिंग संदर्भात १३ ऑक्टोबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण नगरपालिकेला कचरा टाकण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून बोरी पाखाडी येथे जागा देण्यात आली होती. परंतु जागेच्या बाजूला सर्वत्र खारफुटी तसेच सीआरझेड लागू होत आहे. नगरपालिकेचा कचरा हा डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या खारफुटीवर पसरला जात आहे. याचा त्रास हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्या विरोधात हनुमान कोळीवाडा गावातील मच्छिमार विकास संस्थेने २०१८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उरण नगरपरिषदेने खारफुटी असलेल्या प्रतिबंधीत जाग्यावर कचरा न टाकण्याचे आणि लवकरच डंम्पिग ग्राऊंडसाठी इतरत्र जागा शोधण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

मात्र नगरपालिकेचा कचरा बाजूच्या खारफुटींवर जेसीबाच्या सहाय्याने पसरला जात असल्याचे आणि खारफुटीवरील कचर्‍याला आगी लावल्या जात असल्याचे छायाचित्रांच्या सहाय्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास मच्छीमार विकास संस्थेने आणून दिल्यामुळे उच्च न्यायालयाने या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात येत्या १३ आक्टोबरला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात उरण नगरपालिका काय प्रतिज्ञापत्र सादर करते याकडे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.